State News : तू माझी नाही तर कुणाचीच नाही…म्हणत मोडला प्रेयसीचा विवाह!
पुणे : प्रेयसीचा विवाह दुसऱ्या तरुणासोबत ठरला. त्यामुळे प्रियकराने तिला “तू फक्त माझी आहे. मी तुला दुसऱ्याची होऊ देणार नाही’ असा दम भरून ठरलेला विवाह मोडला. याप्रकरणी २१ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून संशयित प्रियकर प्रशांत दिलीप हागवणे (रा. नांदोशी रोड, किरकिटवाडी, ता. हवेली, जि. पुणे) याच्याविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, प्रशांत व तरुणीची फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीतून मैत्री आणि त्यातून प्रेम झाले. ४ वर्षांपासून दोघे प्रेमात होते. त्यांना लग्नही करायचे होते. मात्र आंतरजातीय असल्याने प्रशांतच्या कुटूंबाने लग्नाला विरोध केला. त्यामुळे प्रशांतने दुसऱ्या मुलीशी लग्न केले होते. प्रशांतचे लग्न झाल्याने तरुणीच्या कुटूंबियानी सुद्धा तिचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. तरुणीचा हडपसर येथील एका तरुणाशी विवाह ठरला. त्यामुळे प्रशांतने पुन्हा तरुणीशी संपर्क केला. इन्स्टाग्रामवर मेसेज करून “तू मला हवी आहे. तू माझी होऊ शकली नाही. मी तुला कुणाचीही होऊ देणार नाही’, अशी धमकी प्रशांतने तरुणीला दिली. त्याने तिचा विवाह ज्या तरुणाशी ठरला होता त्या तरुणाची भेट घेतली व ठरलेला विवाह मोडला. माजी प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.