STATE NEWS अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराजाचे सामान जाळले.! पाय दाबण्याच्या बहाण्याने १३ वर्षीय मुलीवर केला होता लैंगिक अत्याचार...

 
 
कन्नड (लाइव्ह ग्रुप नेटवर्क): १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोप असलेल्या दादा महाराज अकोलकर याचे सामान जाळून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर येथे या दादा महाराजाचा वारकरी कन्या आश्रम नावाचा आश्रम होता. या आश्रमातील कुटीत तो रहायचा. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्याची कुटी कुणीतरी जाळून टाकली, यात त्याचे कुटीत असलेले सामानही जळाले. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दादा महाराज सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
प्राप्त माहितीनुसार दादा महाराज अकोलकर याचे वय ६७ वर्षांचे आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर येथे तो माऊली वारकरी कन्या आश्रम नावाचा आश्रम चालवायचा. यात १२ ते १८ वर्षे वयोगटातील १५ मुली शिक्षणासाठी रहात होत्या. मात्र गेल्या महिन्यात २० ऑगस्टला त्याने आश्रमातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाय दाबण्याचा बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती.
त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. आश्रमातील मुलींनी आश्रम सोडल्याने आश्रम सध्या बंद आहे. या आश्रमाच्या बाजुलाच एक कुटी होती, त्या कुटीत हा महाराज रहात होता. या कुटीत महाराजाचे काही सामान होते. ही कुटी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने महाराजाची कुटी आणि त्याचे सामान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संतापाच्या भरात कुणीतरी महाराजाचे सामान पेटवल्याचा संशय पोलिसांना आहे..
 पाय दाबण्याचा बहाणा अन् लैंगिक अत्याचार...
अकोलकर महाराजाच्या आश्रमात १५ मुली राहत होत्या. त्यातील १३ वर्षीय मुलीकडून तो सुरुवातीला पाय दाबून घ्यायचा. सर्व मुली झोपलेल्या असताना २० ऑगस्टच्या रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास त्याने मुलीला पाय दाबण्याच्या बहाण्याने उठवले. ती पाय दाबत असतांनाच त्याच्या मनातील वासना जागृत झाली आणि त्याने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. घडलेली घटना कुणाला सांगू नको, सांगितल्यास तुला शिकवणार नाही अशी धमकीही त्याने मुलीला दिली.धमकीला घाबरून तिने सर्व काही सहन केले. 
त्यानंतर दादा महाराज याने आणखी एका १४ वर्षीय मुलीला उठवले. तिलाही पाय दाबायला सांगून बलात्काराचा प्रयत्न केला. दरम्यान बाहेरून आवाज आल्याचा भास झाल्याने दादा महाराज उठला. याच संधीचा फायदा घेत त्या मुलींनी तिथून पळ काढला.
दोन्ही मुलींनी भयग्रस्त अवस्थेत कशीबशी रात्र जागून काढली त्यानंतर घडलेला घटनाक्रम कुटुंबियांना सांगितला. मुलीच्या कुटुंबीयांनी महाराजाला जाब विचारला असता बलात्कार केलाच नाही असे तो सांगत होता. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.