State News : पुण्यात तरुणीवर चौघांचा सामूहिक बलात्कार!; शेजाऱ्यांनी घराला बाहेरून कडी लावल्याने आरोपी आयतेच पोलिसांच्या ताब्यात
पुणे ः पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीला ओळख काढून जनता वसाहतीतील एका घरात आणून चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काल, २७ जुलैला सायंकाळी समोर आली आहे. दत्तवाडी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. घरातून ओरडण्याचा, रडण्याचा आवाज आल्याने नागरिकांनी पोलिसांना कळवले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन दरवाजा उघडला तेव्हा आरोपींसह तरुणी मिळून आली. पीडित तरुणी मानसिक आजारी असल्याचे समजते.
घटनास्थळी पोलीस आले तेव्हा नागरिकांनी घराच्या दरवाजाची कडी बाहेरून लावलेली होती. त्यामुळे आरोपींना पळताच आले नाही. घराजवळ सात ते आठ महिलांनी ठाण मांडले होते. घरातून रडण्याचा आवाजही येत होता. पोलिसांनी दरवाजा उघडला. आरोपींना ताब्यात घेत पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. श्रीकांत सरोदे (३६), आदित्य ऊर्फ सन्या पवार (१९), सुर्वेश जाधव (३६) आणि आशिष मोहिते (१८, सर्व रा. जनता वसाहत) अशी आरोपींची नावे आहेत. पीडिता स्वारगेटवरून घरी जात होती.
आरोपीपैकी एकाने तिच्याशी ओळख काढून घरी आणले होते. घरात आधीच एक आरोपी होता. त्यानंतर दोन आरोपी आले. चौघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पीडिता ओरडत, रडत होती. त्यामुळे शेजाऱ्यांनी या घराकडे धाव घेतली. त्यांना काळेबेरे वाटल्याने तातडीने त्यांनी घराची कडी बाहेरून लावली आणि पोलिसांना कळवले.