महिन्याला १५०० ऐवजी फक्त ५०० रुपयेच? 'लाडकी बहीण' योजनेत मोठा बदल! नेमकी भानगड काय?

 
मुंबई (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील अनेक महिलांसाठी लागू असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता या योजनेचा पूर्ण लाभ म्हणजेच दरमहा १५०० रुपये फक्त त्या महिलांनाच मिळणार आहे, ज्या इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नाहीत. 
 
 
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळतोय त्या महिला जर 'लाडकी बहीण' योजनेस पात्र असतील, तर त्यांना या योजनेतून फक्त उर्वरित ५०० रुपयेच सन्मान निधी मिळणार आहे. म्हणजेच अशा महिलांना एकूण लाभ १५०० रुपयेच राहील, पण 'लाडकी बहीण' योजनेतून मिळणारी रक्कम केवळ ५०० रुपये असेल.
महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत या बदलाचं स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की, "२८ जून २०२४ व ३ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार, फक्त इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांनाच 'लाडकी बहीण' योजनेतून १५०० रुपये मिळणार आहेत. इतर योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना त्या रकमेच्या फरकाची भरपाई सन्मान निधी म्हणून दिली जात आहे."
या निर्णयामुळे राज्यातील ७ लाख ७४ हजार १४८ महिला केवळ ५०० रुपयांचाच लाभ घेणार आहेत. सरकारच्या या भूमिकेमुळे काही महिलांमध्ये नाराजी तर काहींमध्ये समाधान दिसून येत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व राज्य सरकारची नमो किसान महा सन्मान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी ६ हजार दिले जातात. दोन्ही योजनांचे मिळून वर्षाला १२ म्हणजेच महिन्याला सरासरी १ हजार रुपये मिळतात. ज्या शेतकरी महिला या दोन्ही योजनांचा लाभ घेतात त्यांना लाडकी बहीण योजनेतून आता केवळ प्रति महिना ५०० रुपये मिळणार आहेत.