राज्यभरातील पत्रकारांसाठी गुड न्यूज! पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा; व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के म्हणाले, प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत लढा सुरू राहणार....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ असावे अशी मागणी गेल्या ३ वर्षांपासून लावून धरली होती. अखेर त्या लढ्याला यश मिळाले असून आज,१० ऑक्टोबरला राज्य सरकारने पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली आहे. राज्यभरातील पत्रकारांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या सुपिक कल्पनेतून ही कल्पना समोर आल्यानंतर गत ३ वर्षांत १३ आंदोलने या मागणीसाठी करण्यात आली होती.

  व्हाईस ऑफ मीडियाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ असावे अशी मागणी केली होती. त्यानंतर व्हॉईस ऑफ मीडियाने या मागणीसाठी मंत्रालयीन पातळीवर अनेकदा या मागणीचा पाठपुरावा केला. गतवर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आंदोलन, आझाद मैदानावर आंदोलन, राज्यभरात जिल्हा व तालुका पातळीवर या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन झाले होते.अखेर आज राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकी पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मात्र जोपर्यंत महामंडळासाठी आर्थिक तरतूद होत नाही आणि प्रत्यक्ष पत्रकारांना लाभ मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.