

गुड न्यूज! ३१ मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिकविमा! आ. श्वेताताईंच्या लक्षवेधीला कृषिमंत्र्यांचे उत्तर...
Mar 22, 2025, 18:01 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ३१ मार्चच्या आधी मागील वर्षीचा बाकी असलेला व या वर्षीचा ध्येय असलेला सर्व पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. खुद्द राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत ही माहिती दिली. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी यासंदर्भात केलेल्या लक्षवेधीला कृषीमंत्र्यांनी उत्तर दिले.
काल, आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी पिक विम्या संदर्भात सभागृहाची लक्षवेधले. पिकांचे नुकसान होऊन पिकांच्या नुकसानीची तक्रार दाखल झाली की तीस दिवसांच्या आत भरपाई मिळावी असा नियम असताना खरीप हंगाम संपून आणि तक्रारी व पंचनामे होऊन चार महिने लोटले तरी पिक विमा कंपनी नुकसान भरपाई का देत नाही? असा सवाल करीत आ. श्वेताताईंनी सभागृहाचे लक्ष वेधले. पिक विमा कंपन्यांचे स्वतःचे मनुष्यबळ नसताना त्यांना सर्व प्रकारची मदत शासनाचा कृषी विभाग करतो. कृषी सहाय्यक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी करतात, झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतात, त्यांनी अतिशय कष्टाने केलेला सर्वे असताना व त्या सर्वे मध्ये नुकसान भरपाई जास्त दिसत असल्याने पीक विमा कंपनी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. कृषी सहायकांनी केलेल्या सर्वे विरोधात अपील दाखल केल्या जात असेल तर अशा वेळेस प्रत्यक्ष नुकसान ज्याचे होते त्या शेतकऱ्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? असा सवालही आ. श्वेताताईंनी केला. तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय समितीने मान्यता देऊनही ४७१ पैकी १६० ठिकाणी पिक विमा कंपनीने विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केल्या असून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करण्यास विलंब लावत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे याबाबत विमा कंपनीला सक्त निर्देश देऊन नुकसान भरपाई तातडीने वितरित करण्याबाबत सूचना द्याव्यात अशी मागणी आ.सौ. श्वेताताईंनी केली. आ. श्वेता ताईंच्या या लक्षवेधीला उत्तर देताना, ३१ मार्चच्या आधी मागील वर्षीचा बाकी असलेला व यावर्षीचा ध्येय असलेला सर्व पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे आश्वासन दिले..