हमारी मांगे पुरी करो! शिक्षक भरतीसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनदरम्यान होणार आंदोलन ; युवा विद्यार्थी असोसिएशन आक्रमक..

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शासनाने पहिल्या टप्प्यात केवळ २१ हजार पदांची जाहिरात काढून आतापर्यंत ११ हजार एव्हढ्या अल्प उमेदवारांना न्याय दिला आहे. त्यामुळे किमान रिक्तपदे व गुणवत्ता पूर्ण उमेदवारांची संख्या व दुसरीकडे रिक्त पदांची लक्षणीय असलेली आकडेवारी लक्षात घेता दुसऱ्या टप्प्यात ३० हजार पदे भरतीची जाहिरात काढून अभियोग्यता धारकांना न्याय मिळावा, या मागणीसाठी नागपूर येथे १६ डिसेंबर २०२४ पासून आयोजित हिवाळी अधिवेशनदरम्यान आंदोलन छेडण्याचा इशारा युवा विद्यार्थी असोसिएशन, महाराष्ट्राचे अध्यक्ष तुषार देशमुख यांनी एका निवेदनाव्दारे दिला आहे.
राज्यात अनेक दिवसांपासून अभियोग्यता बुध्दीमत्ता चाचणी झाली, दुसरीकडे राज्यात, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, खाजगी शैक्षणिक संस्था, कटक मंडळे येथे शिक्षकांच्या रिक्त पदांचा आकडा २०२२ च्या संचमान्यतेनुसार तब्बल ६७ हजारांपेक्षा अधिक एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर आहे. अशातच पात्र उमेदवारांची संख्याही लाखांचा संख्येत आहे. मागील काळात शिक्षकभरतीस प्रारंभ झाल्यापासून राज्याचे तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उमेदवारांनी केलेल्या, मुंबई, पुणे, नागपूर अशा विविध ठिकाणी, दोन टप्प्यांत, विभागणी करून ५० हजार पदे भरण्याचे वेळोवेळी अश्वासित केले.
परंतु त्यात संथगतीने शिक्षकभरती प्रक्रिया राबविताना, पहिल्या टप्प्यात केवळ २१ हजार पदांची जाहिरात काढून केवळ या माध्यमातून आतापर्यंत ११ हजार एव्हढ्या अल्प उमेदवारांना न्याय मिळाला. आता किमान रिक्तपदे व गुणवत्ता पूर्ण उमेदवारांची संख्या व दुसरीकडे रिक्त पदांची लक्षणीय असलेली आकडेवारी लक्षात घेता, दुसऱ्या टप्प्यात तरी ३० हजार पदांची जाहिरात काढण्यात यावी, यासाठी, मुंबई मंत्रालय येथे पावसाळी अधिवेशन दरम्यान आंदोलन केले. यावेळीही आंदोलन प्रतिनिधींना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दुसरा टप्पा लवकरच करणार असल्याचे अश्वासित केले. त्यानंतर, ऑगस्टमध्ये शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे तब्बल ५ दिवस अन्नत्याग आंदोलन केले. यावेळी लेखी पत्र देऊन अश्वासित केले. त्यानंतर, ५ ऑक्टोबर २०२३ रोजी तब्बल ४ दिवस अन्नत्याग या उमेदवारांनी केले. यावेळीही लेखी पत्राद्वारे विधानसभा निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर लगेच भरतीप्रक्रियेस प्रारंभ करणार असल्याचे लेखी पत्राद्वारे अश्वासित केले. परंतु, विधानसभा निवडणुकीचे निकाल आले, नवे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पद गोपनीयतेची शपथ घेतली, विधीमंडळाचे विशेष तीन दिवसीय अधिवेशन पार पडले. या दरम्यान पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय येथे उमेदवारांनी भेट घेऊन स्मरणपत्र दिले. तरी अद्याप त्यावर कार्यवाही दिसून न आल्याने राज्यातील सर्व उमेदवारांनी नागपूर येथे १६ डिसेंबर २०२४ पासून पासून सुरू होणाऱ्या अधिवेशन दरम्यान तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा विद्यार्थी असोसिएशन, महाराष्ट्राचे अध्यक्ष तुषार देशमुख यांनी एका निवेदनाव्दारे दिला आहे.