बुलढाण्यात अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाचा दणका! सुंदरखेडमधील सावकाराच्या घरावर धाड; कोरे धनादेश, करारनामे अन् महत्त्वाची कागदपत्रे जप्त!

 सहा जणांच्या पथकाकडून कारवाई; आणखी सावकारांचे धाबे दणाणणार? अवैध सावकार त्रास देत असेल तर बिनधास्त करा तक्रार....

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सर्वसामान्यांच्या आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेत अवैध सावकारीचा व्यवसाय करणाऱ्यांविरोधात सहकार विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. बुलढाणा शहरातील सुंदरखेड परिसरात अवैध सावकारीच्या तक्रारीवरून सहकार विभागाच्या विशेष पथकाने एका संशयित सावकाराच्या घरावर धाड टाकली. या कारवाईत कोरे धनादेश, करारनामे, व्यवहारांच्या नोंदवह्या तसेच अवैध सावकारीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, नोटबंदीच्या काळातील नोटाही पथकाच्या हाती लागल्याने या प्रकरणाची उत्सुकता वाढली आहे. जप्त कागदपत्रांची तपासणी सुरू असून, त्यातून आणखी कोणते आर्थिक व्यवहार समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ मधील कलम १६ अंतर्गत सहकार विभागाने ६ नोव्हेंबर रोजी ही कारवाई केली. सुंदरखेड परिसरातील एका गैरअर्जदाराविरुद्ध अवैध सावकारीची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत सहकार विभागाने संबंधित ठिकाणी धाड टाकण्याचा निर्णय घेतला.

सुंदरखेड येथील सम्यक नगर परिसरातील दीक्षा शशिकांत गवई यांनी मोळी पार्क, खामगाव रोड, सुंदरखेड येथील रेखा मनोज पवार यांच्याविरुद्ध अवैध सावकारीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नियुक्त करण्यात आले. या पथकाचे नेतृत्व सहायक निबंधक (प्रशासन) स्वरूप धुमाळ यांनी केले. पथकात सहकार अधिकारी यू. के. सरडकर, योगेश धरसकर, के. डी. शेळके, ए. ए. बारी, निलेश सोनुने आणि अक्षय परिहार यांचा समावेश होता.

कारवाईदरम्यान पथकाने संबंधित ठिकाणाची झडती घेत कोरे चेक, पैशांच्या व्यवहारासंबंधीचे करारनामे, व्यवहारांच्या नोंदवह्या तसेच सावकारीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. जप्त करण्यात आलेल्या दस्तऐवजांची सखोल तपासणी सुरू आहे. या तपासणीतून संबंधित आर्थिक व्यवहारांचे स्वरूप आणि अवैध सावकारीच्या तक्रारीतील तथ्य स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ही कारवाई जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सहकार विभागाचे अधिकारी, कर्मचारी, बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 अवैध सावकारीविरोधात नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे!

या कारवाईनंतर जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात कुठेही अवैध सावकारीचे प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी न घाबरता सहकार विभागाकडे लेखी तक्रार दाखल करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, सुंदरखेडमधील या कारवाईमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जप्त कागदपत्रांच्या तपासणीतून नेमके काय समोर येते आणि या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे.