"काँग्रेसच्या 'गुंगी गुडिया' वक्तव्याचे बुलढाण्यात तीव्र पडसाद! राष्ट्रवादी अजित पवार गट रस्त्यावर; 'जाहीर माफी मागा', अन्यथा हर्षवर्धन सपकाळांना चोप देऊ! संगम चौकात जोरदार घोषणाबाजी"

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या 'गुंगी गुडिया' या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या होमग्राऊंड असलेल्या बुलढाण्यातही उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहरातील संगम चौकात आक्रमक आंदोलन करत हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, महाराष्ट्राची जाहीर माफी मागण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.

काँग्रेसच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापले असताना, बुलढाण्यात झालेल्या या आंदोलनाने वादाला आणखी धार दिली आहे. विशेष म्हणजे, बुलढाणा हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे होमग्राउंड आहे. अशा ठिकाणीच त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रस्त्यावर उतरल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे.

संगम चौकात झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी "महिलांचा अपमान सहन करणार नाही", "हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी" अशा घोषणा देत संताप व्यक्त केला. सुनेत्रा पवार यांच्याविषयी वापरण्यात आलेली भाषा ही महिलांचा अवमान करणारी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांनी इशारा देताना सांगितले की, हर्षवर्धन सपकाळ यांनी तातडीने आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा हर्षवर्धन सपकाळ यांना चोप देण्यात येईल, राज्यभर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.