ब्रेकिंग! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणार? मतदार याद्या गोठवल्याचे प्रकरण उच्च न्यायालयात; पूर्वसूचना न देताच मतदार याद्या गोठवल्याने निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात!
पुरवणी यादी जोडण्याची याचिकाकर्त्यांची मागणी....
Oct 24, 2025, 16:57 IST
मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाकडून तयारी देखील सुरु करण्यात आली आहे..मात्र आता या निवडणुका पुन्हा किमान महिना दोन महिनेपुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात येत असलेल्या मतदार याद्यांची प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै या दिनांकास अस्तित्वात असलेली विधानसभेची यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येईल असा निर्णय घेतला, याचा आदेश २१ ऑगस्ट रोजी काढण्यात आला. मतदारांना कुठलीही पूर्वसूचना न देता यादी गोठवण्यात आल्याने १ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत नोंदणी केलेले नवमतदार या निवडणुकीत मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार असल्याने प्रकरण न्यायालयात गेले आहे. न्यायालयाला दिवाळीच्या सुट्ट्या असल्या तरी अतिमहत्वाचे प्रकरण असल्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे प्रकरण दाखल करून राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली आहे.
१ जुलै रोजी निवडणुकांची कोणतीही घोषणा नव्हती, किंवा संभाव्य तारखा सुद्धा नव्हत्या. शिवाय १ जुलै रोजी मतदार यादी गोठवणार असल्याचे किमान जून महिन्यात पूर्वसूचना देणे अपेक्षित होते. राज्य निवडणूक आयोगाने २१ ऑगस्ट रोजी यासंबंधीची घोषणा केली. राज्य निवडणूक आयोगाच्या या अतिघाईच्या निर्णयामुळे १ जुलै नंतर नोंदणी करणाऱ्यां नवमतदारांना कोणताही दोष नसतांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार यादी गोठवल्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
१ जुलै नंतर नोंदणी केलेल्यांची पुरवणी मतदार यादी प्रकाशित करण्याची मागणी याचिका कर्त्यांची आहे..आता राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेतो यावर निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.....
