

१६ एप्रिलचा दिवस महत्त्वाचा! गावगाड्याचे राजकारण तापणार; जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे निघणार आरक्षण; त्यानंतर २८ एप्रिलला कळणार...
Updated: Apr 12, 2025, 20:04 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राजकारणाची चर्चा पुढील काही दिवस आता होताना दिसणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण १६ एप्रिलला निघणार आहे.. तेरा तालुक्यातील तालुका पातळीवर त्या त्या तहसीलदारांच्या अधिकार क्षेत्रात हा कार्यक्रम होणार आहे.
२०२५ ते २०३० या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकी द्वारे गठित होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण १६ एप्रिलला निघणार आहे. जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत त्या त्या तालुक्यातील तहसील कार्यालय किंवा तहसीलदारांनी निश्चित केलेल्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर २८ एप्रिलला महिलांकरिता आरक्षण सोडत जिल्हा पातळीवर एकत्रित होणार आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात ग्रामपंचायत सरपंच पदाचे महिला आरक्षण २८ एप्रिलला निश्चित होणार आहे..