कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबवली शाश्वत शेतीसाठी बीज प्रक्रिया मोहीम

 
इस्लामपूर, (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय, बुलढाणा येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत इस्लामपूर गावात बीज प्रक्रिया मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
या मोहिमेचा उद्देश शेतकऱ्यांच्या बियाण्यांची उगमशक्ती वाढविणे हा होता. विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगितले आणि प्रत्यक्ष प्रक्रिया करून दाखवली. याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बियाण्यावर प्रक्रिया करण्याची संधी दिली.
या मोहिमेत कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्ष सातव्या सत्रातील विद्यार्थी – शुभम मुले, विवेक निखडे, अनिकेत परिहार, हर्षल पवार, आणि रोशन पोहेकर – यांनी सक्रिय सहभाग घेतला.
मोहिमेसाठी गावातील प्रगतशील शेतकरी श्री. दगडू रामराव वानी, श्री. सीताराम राजाराम वानी, श्री. सखाराम शिवराम वानी, श्री. संजय शिवराम वानी यांच्यासह इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावाच्या सरपंच सौ. अनिता भगवान रिंढे यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. यू. वाघ सर, विषयतज्ज्ञ श्री. एम. एम. सोळंकी सर, तसेच कार्यक्रम अधिकारी श्री. एस. एस. सराप सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमामुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये बीज प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण झाली असून, या प्रकारचे उपक्रम अधिक प्रमाणात राबवावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली.