शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौऱ्याची सुवर्णसंधी! कृषी विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम; अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ जुलै!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता जागतिक दर्जाच्या शेती तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कृषी विभागाने २०२५-२६ साठी 'राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे' ही अभिनव योजना जाहीर केली असून, निवडक शेतकऱ्यांना युरोप, इस्राईल, जपान, चीन, दक्षिण कोरिया आदी देशांत पाठवले जाणार आहे.
या अभ्यास दौऱ्यांचे उद्दिष्ट आधुनिक कृषी तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्ये, उत्पादनक्षमता आणि निर्यातीच्या संधी यांचा थेट अनुभव शेतकऱ्यांना देणे हे आहे.

कोणत्या देशात काय शिकायला मिळेल?
युरोप (नेदरलँड्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स) – फलोत्पादन, सेंद्रिय शेती, दुग्धोत्पादनातील आधुनिक पद्धती
इस्राईल – पाणी व्यवस्थापन आणि कृषी यांत्रिकीकरण
जपान – सेंद्रिय शेती व अत्याधुनिक कृषी प्रयोगशाळा तंत्रज्ञान
मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाइन्स – काढणीपश्चात व्यवस्थापन प्रणाली
चीन – कृषी EXPO आणि पीक उत्पादनवाढ तंत्र
द. कोरिया – अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान व कृषी उत्पादनांची गुणवत्ता वाढवणारे उपाय

पात्रतेचे महत्त्वाचे निकष:
अर्जदार स्वतः शेतकरी असावा आणि शेती हेच मुख्य उत्पन्नाचे साधन असावे.त्याच्या नावावर ७/१२ व ८-अ उतारे (मागील ६ महिन्याचे) असावेत.अॅग्रीस्टॅक अंतर्गत 'Farmer ID' अनिवार्य. वैध पासपोर्ट असणे आवश्यक, ज्याची मुदत किमान ३ महिने शिल्लक असावी. वय किमान २५ वर्षे; शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र बंधनकारक.अर्जदार शासकीय/खाजगी नोकरीत नसावा व वैद्यकीय/व्यावसायिक व्यावसायिक नसावा.यापूर्वी शासनाच्या खर्चाने परदेश दौरा केलेला नसावा.

आर्थिक सहाय्य:
राज्य शासनाकडून दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा ₹१ लाख (जे कमी असेल ते) इतके अनुदान दिले जाईल. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी स्वतः भरायची आहे.

अर्ज प्रक्रिया:
इच्छुक शेतकऱ्यांनी प्रपत्र-१ नमुन्यातील पूर्ण माहिती असलेला अर्ज २४ जुलै २०२५ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा. पात्र अर्जदारांची निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत सोडत पद्धतीने केली जाणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र व कोविड चाचणी अहवाल सादर करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.