स्फोटक प्रकरणात राज्य सरकारचा सूर बदलला
एनआयए तपासाला सहकार्य करण्याचे गृहमंत्री देशमुख यांचे संकेत
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याच्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडून करण्यात येत आहे. सुरुवातीला महाविकास आघाडी सरकारने आता जिलेटीनच्या कांड्या सापडल्याच्या घटनेच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास संस्था राज्यांमध्ये फिरणार का? अशी टीका सामना दैनिकातून करण्यात आली होती. गृहमंत्री अनिल देशमुख व शिवसेनेनेही हा तपास एनआयकडे देण्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पण आता हे प्रकरण एनआयएकडे गेल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती हाती लागल्याचे समजते. त्यामुळे आघाडी सरकारचा सूर बदलला असून राज्य सरकार, पोलीस व तपास यंत्रणा एनआयएला याप्रकरणात संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे. तसेच अहवाल आल्यानंतर त्याआधारे दोषींवर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुखयांनी स्पष्ट केले आहे. सचिन वाझे प्रकरण तसेच मनसूख हिरेन मृत्यूप्रकरण हाताळण्यात पोलीस अधिकार्यांकडून काही गंभीर चुका झाल्याची कबुलीही देशमुख यांनी नुकतीच दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचेने शरद पवार यांनी काही बैठका घेऊन त्याबाबत नाराजी व्यक्त केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेत बदल झाल्याचे म्हटले जात आहे. पण या घडामोडींमुळे महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद उघड झाल्याचेही दिसून आले आहे. विरोधी पक्षांनी हे प्रकरण जोरदारपणे लावून धरल्यानंतर मंत्रिमंडळात विशेषत: गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खाते बदलले जाणार अशीही चर्चा सुरू झाली होती. पण आता ही चर्चा तूर्तास थांबल्याचे दिसते आहे.