सगळे चांगले चालले आहे… मिठाचा खडा टाकू नका
अजितदादांचा संजय राऊत यांना ’रोखठोक‘ सल्ला
मुंबई : अनिल देशमुख यांना गृहमं़त्रालय अपघाताने मिळाले आहे,अशी टीका करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ‘कुणीही महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकू नये‘ असा रोखठोक सल्ला दिला आहे. अजित पवार यांनी संजय राऊत यांचे नाव घेऊन कुठले वक्तव्य केले नसले तरीही त्यांच्या बोलण्याचा रोख त्यांच्याकडेच होता.रविवारी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीचे हे तीन पक्षांचे सरकार आहे. कुणाला मंत्री बनवायचे हा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांचा अधिकार आहे. राष्ट्रवादीत कोणाला मंत्री करायचे हा अधिकार शरद पवार यांचा आहे. आमचे तीन पक्षांचे सरकार आहे हे लक्षात घेऊन या पक्षांशी संबंधित व्यक्तींनी एकमेकांच्या विरोधात वक्तव्ये करून इतरांना अडचणीत आणण्याचा उद्योग करू नये, असे आवाहन पवार यांनी केले. यावेळी त्यांना राऊत यांनी सामना दैनिकात लिहिलेल्या रोखठोकमध्ये देशमुख यांच्याबाबत व सध्याच्या राजकीय स्थितीबाबत लिहिलेल्या लेखाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी वरील शब्दांत आपली नाराजी प्रकट केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत, मंत्री कोण असावेत, याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करत असताना कोणताही पक्ष किंवा नेत्याने काहीही बोलून त्यात मिठाचा खडा टाकू नये, असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.