शिवसेनेच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र- कर्नाटक बस वाहतूक बंद
बेळगावात सेना पदाधिकार्यास मारहाणीचे कोल्हापुरात पडसाद
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळला आहे. कोल्हापूर येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांना दोन दिवसांपूर्वी कन्नड रक्षण वेदिका या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव येथे मारहाण केली होती. त्या घटनेच्या निषेधार्थ व कानडींच्या मुजोरीला उत्तर देण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज कोल्हापूर येथे कर्नाटकच्या बसेसवर दगडफेक केली. तसेच नामफलकाला काळे फासले. यावेळी कर्नाटकविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. कर्नाटकातील मराठी बांधवांवर कानडी अत्याचार सहन केला जाणार नाही.त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या घटनेनंतर दोन्ही राज्यांत होणारी बससेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.दरम्यान या घटनेने सीमाभागातही संतापाची लाट पसरली आहे. बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकार्यांनी याचा निषेध करून दोषींवर कारवाईची मागणी केल आहे.