शिवसेना खासदाराने धमकी दिल्याची खा. नवनीत राणा यांचा आरोप
अरविंद सावंत यांच्याविरोधात लोकसभाध्यक्षांकडे तक्रार
नवी दिल्ली : शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी आपल्याला तु महाराष्ट्रात फिरतेसच कशी ते बघतो, तुलाही जेलमध्ये टाकणार अशी धमकी दिल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात लोकसभाध्यक्षांकडे तक्रार केली आहे. मात्र, खासदार अरविंद सावंत यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत सचिन वाझे प्रकरण उपस्थित केले व त्याआधारे चौकशी तसेच कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आपल्याला संसदेच्या लॉबीमध्ये भेटल्यानंतर त्यांनी आपल्याला बघून घेण्याची धमकी दिली.तू महाराष्ट्रात कशी फिरतेस हेच बघतो, असा इशारा दिला. याबाबत राणा यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून त्याची तक्रार केली आहे. सावंत यांनी मात्र, या आरोपांचा इन्कार केला आहे. नवनीत राणा जेव्हा कधी मला संसदेत भेटतात तेव्हा दादा, भैय्या म्हणून हाक मारतात.मी देखील अनेकदा त्यांच्याशी बोलत असतो. काही गोष्टींच्या बाबतीत त्यांना समजावून सांगतो. पण आपण त्यांना धमकी वगैरे काही दिलेली नाही. माझी ती भाषा नाही. पण त्यांनाच राईचा पर्वत करण्याची सवय असा आरोपही सावंत यांनी केला.