लेटरबॉम्बनंतर परमबीरसिंग सुप्रीम कोर्टात
प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची केली मागणी
नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकत त्यांनी महिन्याला १०० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन वाझे यांच्याकडे केली होती,असा दावा केला होता.आता याप्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून या आरोपांची चौकशी सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे.
त्यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपालांकडे केली होती. त्यांच्या या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.तसेच त्याप्रकरणी गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घेतला जाईल, असे म्हटले जात होते. परंतु पक्षाचे नेते शरद पवार यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे सांगत त्यांचा बचाव केला होता. परमबीरसिंग यांनी केवळ तसा दावा केला असून पुरावे दिलेले नाहीत. त्यामुळे देशमुख यांचा राजीनामा घेण्याची गरज नसल्याचे पवार म्हणाले होते. महाविकास आघाडीनेही देशमुख यांचा बचाव करत प्रकरणाची चौकशी टाळण्याचा प्रयत्न चालवला होता.
पण आता परमबीरसिंग यांनीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून पुरावे नष्ट करण्याआधी देशमुख यांची सीबीआय चौकशी करावी अशी याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयात परमबीरसिंग यांच्यावतीने मुकुल रोहगी हे बाजू मांडणार आहेत.मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून आपली चुकीच्या पद्धतीने हकालपट्टी केली गेली व वाझे प्रकरणाचे खापर आपल्यावरच फोडले गेले. शिवाय मुख्यमंत्र्यांनी आपल्या म्हणण्याची दखल घेतली गेली नाही म्हणून परमबीरसिंग दुखावले गेले आहेत.