“लिव्ह इन’मध्ये राहताना लग्नासाठी करत होती आग्रह, जोडीदाराने काटा काढला!
गोंदिया ः ज्याच्यासोबत ती लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. त्यानं तिला जंगलात नेलं आणि मित्राच्या मदतीनं त्यानं प्रेयसीचा काटा काढला. हत्येच्या घटनेनंतर एक महिन्यानंतर पोलिसांना खुनाचा उलगडा झाला. पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य दोघांना अटक केली आहे. तरुणीला जंगलात नेवून तिची निर्घृण हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली.
२३ जून रोजी गोंदिया जिल्ह्यातील ढासगड इथं एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. गळ्यावर, डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले होते. ही तरुणी कोण आणि तिचे हत्यारे कोण हे शोधणं पोलिसासमोर आव्हान होतं. खुनाचं गूढ वाढलं होतं. पोलिसांनी मृत तरुणीचे फोटो सोशल मीडियावर टाकले. तिची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी प्रियकर व त्याच्या दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. समीर असलम शेख (वय 26, बावलानगर बुटीबोरी) असं अटक केलेल्या प्रियकराचं नाव आहे.
आसिफ शेरखान पठाण (वय 35) आणि प्रफुल्ल पांडुरंग शिवणकर (वय 25) अशी अन्य दोन तरुणांची नावं आहेत. समीर हा तरुणीसोबत लीव्ह इनमध्ये राहत होता. तरुणीनं समीरकडं लग्नाचा तगादा लावला; पण समीर लग्नसाठी टाळाटाळ करीत होता. लग्नाचा तगादा लावल्यानं समीरनं तिचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यानं आसिफ आणि प्रफुल्ल या दोघांशी संगनमत केलं. प्रियकरानं फिरण्याच्या बहाण्यानं तिला ढासगड येथील जंगलात नेलं. मित्रांच्या मदतीनं प्रेयसीवर धारदार शस्त्रानं वार केले. पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणीचा मृतदेह जंगलात नेऊन टाकला.