मराठा आरक्षणावर शिवसेना आक्रमक
नवी दिल्ली : संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा तापवायचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. आरक्षणाच्या मुद्यावर शिवसेनेचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. त्यासाठी त्यांनी वेळ मागितली आहे.
खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर राऊत यांनी या बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मोदी यांची भेट घेतली होती. त्या वेळी मांडलेल्या ११ प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या खासदारांना मोदी यांची भेट हवी आहे. पंतप्रधानांची वेळ मागितली असल्याचं खा. राऊत यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी वेळ दिल्यानंतर मागण्या सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. खासदारांच्या बैठकीतील चर्चेचा तपशील राऊत यांनी दिला. महाराष्ट्रातील काही प्रश्न आहेत. अनेक प्रश्न विकासाच्या संदर्भातील आहेत. काही सामाजिक आहेत. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचे प्रश्न आहेत. मेट्रो, जीएसटी परतावा, पीक विमा आदी प्रश्नांकडं पंतप्रधानांचं लक्ष वेधायचं आहे, असं त्यांनी सांगितलं.