फसव्या लग्नाची ‘सप्त‘पदी; आठवा प्रयत्न फसल्याने जाळ्यात
खोटी लग्ने करून तरुणांना गंडविणार्या तरुणीसह तिघे गजाआड
आष्टी : लग्नाची व सुखी संसाराची स्वप्ने दाखवून तरुणांना जाळ्यात ओढायचे… त्याच्याशी खोटोखोटे लग्न जमवून विवाहाचे नाटक करायचे. त्याच्या घरी राहायला गेल्यानंतर आपल्या साथीदारांना बोलावून घेऊन त्या लग्नाला माझी बायको पळविली, आता तुझ्यावर केस करतो म्हणून दबावात आणायचे व त्याच्याकडून प्रकरण मिटवण्यासाठी पैसे (खंडणी) उकळायची. असे उद्योग करून एक-दोन नव्हे तर तब्बल सात तरुणांना फसविणार्या तरुणीसह दोन साथीदारांच्या मुसक्या अखेर आष्टी पोलिसांनी आवळल्या. या टोळीने विविध जिल्ह्यांतील आणखी किती तरुणांना फसविले याचा आता शोध घेतला जात असल्याचे आष्टीचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी सांगितले. सोनाली गणेश काळे (वय २९.रा.खंडापूर, लातूर) अजय महारुद्र चवळे, रामा काशिनाथ बडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या चौकशीतून त्यांनी याआधी सात तरुणांना फसविल्याचे व त्यांच्याकडून खंडणी उकळल्याचे समोर आले आहे.लग्न न झालेल्या तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून त्याच्याशी सोनाली लग्न करत असे. त्यानंतर तिचे साथीदार येऊन आमचे आधीच लग्न झाले आहे. तू माझी बायको पळविलीस. आता पोलिसांत तुझ्याविरोधात फसवणुकीचा व बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देत. घाबरलेला तरुण व त्याचे नातेवाईक बदनामीच्या भीतीने मागेल तेवढे पैसे देऊन प्रकरण मिटवत. वर पुन्हा तक्रारही दाखल होत नसे. अशाच पद्धतीने सोनाली व तिच्या साथीदारांनी सात जणांना फसविले.आठव्यांना आष्टी तालुक्यातील शिरोळ येथील एका तरुणाशी तिने विवाह केला. पण त्या तरुणाने ठाणे गाठल्याने सोनाली व तिचे साथीदार जेरबंद झाले.