त्या दिवशी अनिल देशमुख होते कुठे?
शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याने वाढला संभ्रम
मुंबई : फेब्रुवारीच्या मध्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना त्यांच्या बंगल्यावर बोलावून घेऊन मासिक १०० कोटी रुपयांची खंडणी जमा करण्यास सांगितले होते,असा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी केला होता. त्याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी त्या तारखेला अनिल देशमुख हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे ते क्वॉरइंटाईन होते, असा दावा केला होता. म्हणण्याचा पुरावा म्हणून देशमुख अॅडमिट असलेल्या हॉस्पिटलचे बिल/ स्टेटमेंट सोबत दाखवले होते.आपण याआधारे हा दावा करत आहोत, असे सांगत देशमुख यांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचे सांगितले होते.
त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १५ फेब्रुवारी रोजी देशमुख यांनी ़घेतलेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर करत… तर मग हे कोण आहे? असा प्रश्न शरद पवार यांना केला आहे. फडणवीस यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर भाष्य करताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपण त्यादिवशी पत्रकारांशी बोललो. सकाळी पत्रकारांशी बोललो. त्यावेळीही आपली तब्येत बरी नव्हती.त्यानंतर मी १५ ते २७ तारखेपर्यंत होम क्वॉरंटाईन होतो, असा दावा देशमुख यांनी केला आहे. या उलटसुलट दाव्यांमुळे देशमुख यांच्या त्या दिवसाच्या उपस्थितीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.