काळीज पिळवटून टाकणारी सुसाईड नोट! आत्महत्येपूर्वी कैलास नागरेंनी लिहिली ४ पानांची सुसाईड नोट! आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा, पण पाणी नाही; खडकपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी.
Mar 13, 2025, 11:43 IST
केळी, पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा; राख आनंदस्वामी धरणात टाका; रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व विधी उरका म्हणाले,
मुख्यमंत्र्यांना म्हणाले, माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारा...
मुलांचे शिक्षण करण्यासाठी, सुखदःख करण्यासाठी मी असमर्थ ठरलो, स्वतः शून्य झालो अन् मुलं,बाबा,बायको यांनाही शून्य करूनच जातोय..
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील प्रगतिशील शेतकरी कैलास नागरे यांनी विषारी औषध प्राशन करून आज आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी कैलास नागरे यांनी लिहिलेली ४ पानांची सुसाईड नोट बुलडाणा लाइव्ह ला प्राप्त झाली आहे. या सुसाईड नोट मध्ये कैलास नागरेंनी आत्महत्या करण्याचे कारण लिहिले आहे. याशिवाय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार खासदारांनाही त्यांनी आवाहन केले आहे. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळावे यासाठी कैलास नागरे यांनी लढा उभारला होता. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतही कैलास नागरेंनी शेतीसाठी पाणी द्या अशी मागणी केली आहे.. आमचा पाण्यासाठीचा संघर्ष खूप जुना आहे. तो तात्काळ मार्गी लावा, आमच्या पंचक्रोशीत जर बारमाही पाणी आले तर शेतकरी भरकटणार नाही असेही कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये लिहिले आहे..
आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत, फक्त शेतीला हमी पाणी नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये सातत्य राहत नाही, त्यांचा आर्थिक समतोल बिघडतो आणि कर्जबाजारी होतो अन् वैफल्यग्रस्त होऊन तो नैराश्येच्या गर्तेत जातो. त्याला जगणे असह्य होते असेही कैलास नागरे यांनी लिहिले आहे. या सुसाईड नोट मध्ये कैलास नागरे यांनी शेतीच्या वादाचाही उल्लेख केला आहे. गावकऱ्यांनी हा वाद आपसात बसून सोडवावा असेही त्यांनी लिहिले आहे.
मी असमर्थ ठरलो..
शेतीच्या उत्पादनात सातत्य नसल्याने मी भरकटलो. घडगाडा शेतीचा गाडा, कोर्टकचेरी, मुलांचे शिक्षण, सुखदुःख करण्यासाठी मी असमर्थ ठरलो.. मी स्वतः शून्य झालो, मागेही शून्य सोडून चाललो,मुलं,बाबा,बहिणी,भाऊजी, बायको यांनाही शून्य करूनच जातोय.. माझ्या बाबांच्या भाषेत हे प्रारब्धाचे भोग आहेत, ते सर्वांनाच भोगावे लागणार असेही स्व. कैलास नागरे यांनी लिहिले आहे..
मुलांचे पालकत्व स्वीकारा..
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री,खासदार, आमदार यांनी आमच्या मुलांचे पालकत्व कृपया करून स्वीकारावे व वादग्रस्त शेतीचा वाद मिटवावा असेही कैलास नागरे यांनी लिहिले आहे