कार्यालयातच तिच्यावर करायचा बलात्कार!; नोकरीवरून काढण्याची धमकी देत विवाहितेवर १० वर्षे अत्याचार, पतीपासून घटस्फोटही घ्यायला लावला!!
ठाणे ः नोकरीवरून काढण्याची धमकी देत एका महिलेवर दहा वर्षे बलात्कार करण्यात आला. लग्नाचे आमिष दाखवून तिला पतीपासून घटस्फोट घ्यायला लावला. लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर व्हिडिओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. अखेर कंटाळून या महिलेने पोलिसांत धाव घेतली. नाैपाडा पोलिसांनी आशुतोष धुर्वे (४८, रा. नौपाडा, ठाणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आशुतोष याने २०१० ते मार्च २०२१ या दहा वर्षांत ३४ वर्षांच्या विवाहितेवर वारंवार बलात्कार केला. त्याने तिला कल्याणच्या एका हॉटेलमध्ये वारंवार नेऊन, तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. ठाण्यातील तीन हात नाका येथील त्यांच्या कार्यालयातील बेडरुममध्येही तिच्याशी बळजबरीने संबंध ठेवले. तिला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत ठाण्यातील लोढा कॉम्पलेक्समधील एका मित्राच्या फ्लॅटवर लैंगिक अत्याचार केले. आशुतोष राहत असलेल्या खारेगाव येथील इमारतीमधील एका सदनिकेत तिच्यावर वारंवार बलात्कार केले. तिला दिलेल्या पैशांची तिच्याकडे तो मागणी करायचा. त्यांच्या संबंधांची व्हिडिओ क्लिप त्याने काढली होती. ती प्रसारित करण्याची धमकी देऊन आशुतोष तिला शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडायचा. स्वतः घटस्फोट न घेता तिला मात्र त्यानं तिच्या पतीपासून घटस्फोट घ्यायला भाग पाडलं. एकीकडं तो पत्नीसोबत राहत असताना या महिलेशी शय्यासोबत करीत होता. लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर मात्र तिला तो तू खालच्या जातीची आहे, म्हणून हिणवायचा. उच्च जातीचे असल्याचा दावा करीत आशुतोषनं तिच्यासोबत लग्नास नकार दिला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आशुतोष फरार झाला.