असा पिता शोधून सापडणार नाही… “मुलीसाठी अवघ्या दुनियेशी लढण्याची तयारी!’

नाशिक ः एकीकडे स्वार्थासाठी, समाजातील इज्जतीसाठी मुलीच्या आनंदाचा बळी घेणारे पिता पावलोपावली दिसतात. त्यांना यात काही चुकीचेही वाटत नाही. उलट समाजाला पुढे करून ते स्वार्थ साधत असतात. नाशिकमधील हिंदू मुलीने मुस्लिम मुलाशी गेल्या दोन महिन्यांपूर्वीच विवाह केला आहे. दोन्ही कुटुंबीयांची या विवाहाला मान्यता आहे. असे असताना मुलीचे धर्मांतर करून विवाह करण्यात येत असल्याची आवई उठविण्यात …
 

नाशिक ः एकीकडे स्वार्थासाठी, समाजातील इज्जतीसाठी मुलीच्या आनंदाचा बळी घेणारे पिता पावलोपावली दिसतात. त्‍यांना यात काही चुकीचेही वाटत नाही. उलट समाजाला पुढे करून ते स्वार्थ साधत असतात. नाशिकमधील हिंदू मुलीने मुस्लिम मुलाशी गेल्या दोन महिन्यांपूर्वीच विवाह केला आहे. दोन्ही कुटुंबीयांची या विवाहाला मान्यता आहे. असे असताना मुलीचे धर्मांतर करून विवाह करण्यात येत असल्याची आवई उठविण्यात आली. मुलीच्या वडिलांना धमक्या देण्यात आल्या. त्यामुळे मुलीच्या विवाहानिमित्तचा स्वागत समारंभ रद्द करण्याची वेळ मुलीच्या कुटुंबीयांवर आली. मुलीचे वडील प्रसाद आडगावकर यांनी या धमक्यांना न जुमानता मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे.

आई- वडिलांच्या खोट्या प्रतिष्ठेपायी लावून दिले जात असलेले विवाह टिकत नाही. टिकले, तरी त्यात सातत्यानं कुरबुरी होत असतात. या पार्श्वभूमीवर धर्म, जात, पंथ या भेदापलीकडे जाऊन आपण मुलीला तिच्या आवडीप्रमाणे मुलगा शोधून दिला. धर्माची ढाल पुढे करून विवाहाला आता विरोध केला जात असला, तरी तिचा विवाह पूर्वीच नोंदणी पद्धतीने झाला आहे. आता हिंदू विवाह पद्धतीने तो करण्याची इच्छा होती. तिच्या आनंदासाठी मी कुणाशीही पंगा घ्यायला तयार आहे, असे आडगावकर यांनी सांगितले.

स्वागत समारंभाच्या पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उलटसुलट मते व्यक्त झाली. गदारोळ झाला. सामाजिक शांतता, सलोखा चांगला राहावा, अशी दोन्ही कुटुंबांची भावना असल्याने स्वागत समारंभ रद्द करण्यात आला. मुलीचे लग्न एका दिवसात ठरविलेले नाही. मुलीचे लग्न समाजात व्हावे, यासाठी खूप प्रयत्न केले. समाजातून प्रतिसाद मिळाला नाही. ती अल्प दिव्यांग आहे. तिच्या दिव्यांगासह तिला स्वीकारायला समाजातला, धर्मातला कुणी पुढे आला नाही; परंतु एक परधर्मीय तिच्या दिव्यांगासह तिला स्वीकारायला तयार झाला, ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, असे आडगावकर यांनी सांगितले. मुलाला आम्ही आणि त्याने आम्हाला समजावून घेतले आहे. विवाहासाठी किंवा नंतरही धर्मांतर करण्याचा आग्रह धरणार नाही. तिची पूजा-अर्चा, विधी ती सुरू ठेवू शकणार आहे. धर्मात हस्तक्षेप करणार नाही, तर इथं लव जिहादचा संबंध येतोच कुठे, असा सवाल मुलीच्या वडिलांनी केला. काहींनी मुलाचे धर्मांतर करून घेण्याचा सल्ला दिला. मुलीचे जसे धर्मांतर करणार नाही, तसेच मुलाचेही नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.