“रिलायन्स’कडून शेतकऱ्यांची थट्टा!; पीक विम्यापोटी तुटपुंजी रक्कम खात्यात झाली जमा!; शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप
जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव या तालुक्यांना पिक विमा मंजूर झाला. शेतकऱ्यांच्या खात्यात मागील एक-दोन दिवसांत रक्कम यायला सुरुवात झाली. मात्र शेगाव तालुक्यातील मनसगाव सर्कलला 47 लाख विमा मंजूर झाला असून, शेतकऱ्याला एकरी 400 ते 500 रुपये एवढी तुटपुंजी मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत.
शेगाव तालुक्यातील डोलारखेड येथील शेतकरी वासुदेव शंकर देठे यांचे शेत मनसगाव सर्कलमध्ये कालवड शिवारात असून, त्यांच्या खात्यावर विमा रक्कम 212 रुपये आले आहेत.
शेतकऱ्यांची थट्टाच रिलायन्स इन्शुरन्स कंपनी करत असल्याचे यातून दिसून येते. मनसगाव सर्कलमधील बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विमा कमी प्रमाणात मिळालेला आहे. संबंधित विमा कंपनी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांची विमा रक्कम वाढवून देण्यात यावी, अशी मागणी मनसगाव सर्कलमधील सर्व शेतकरी करत आहेत.