‘बुलडाणा लाइव्ह’ची अल्पावधीत मोठी झेप : विजय भालतडक; ‘कर्मयोद्धा’चे थाटात प्रकाशन
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः विशेष प्रतिनिधी) ः बुलडाणा लाइव्ह सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे प्रभावी व्यासपीठ आहे. निर्भीड, सत्य बातम्या आणि गुणवत्तेमुळे अल्पावधीत तळागळातील लोकांपर्यंत बुलडाणा लाइव्ह पोहोचले आहे. बुलडाणा लाइव्हने माजीमंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त काढलेला कर्मयोद्धा विशेषांक दर्जेदार अन् अप्रतिम असून, आमदार कुटे यांचा असा सन्मान फक्त बुलडाणा लाईव्हच करू शकते, असे गौरवोद्गार भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष विजय भालतडक यांनी केले.
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री तथा जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय श्रीराम कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा लाइव्हतर्फे आज, 9 मार्चला कर्मयोद्धा ही विशेष पुरवणी प्रसिद्ध केली. या सोहळ्यात श्री. भालतडक बोलत होते. श्री. कुटे यांचा वाढदिवस भाजपाच्या शेगाव शहर व तालुका शाखेतर्फे साजरा करण्यात आला. सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून सुरभी कॉलनीत वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सावली सेवा प्रकल्प येथे दिव्यांगांना रेशन व जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनाविषयक नियम पाळून शिवालय गेस्ट हाऊसमध्ये बुलडाणा लाइव्हच्या कर्मयोद्धा पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकात अमित जाधव म्हणाले, की अतिशय कमी काळात बुलडाणा लाईव्हने वाचकांच्या मनात स्थान मिळवले आहे. रोज एक लाखाच्यावर वाचकसंख्या असलेले हे बुलडाणा जिल्ह्यातील एकमेव लोकल पोर्टल आहे. एक करोड तीस लाखांच्या व्ह्यूजचा टप्पा गाठणे कुणाला शक्य झाले नसावे. हा चमत्कार बुलडाणा लाइव्हने वाचकांच्या बळावर केला आहे. बुलडाणा लाईव्हवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या सर्व बाजूंनी पडताळलेल्या असतात. सत्य, निर्भीड असतात. अफवांना बुलडाणा लाइव्ह थारा देत नाही. बुलडाणा लाईव्हने कर्मयोद्धा हा वाढदिवस विशेषांक काढून संजय कुटे यांचा सन्मान केला त्याबद्दल मी शेगाव शहर व तालुका भाजपतर्फे आभार व्यक्त करतो, असेही श्री. जाधव म्हणाले. यावेळी नगराध्यक्षा शकुंतलाताई बुच, नगरपरिषद उपाध्यक्ष सौ. सुषमा शेगोकार ,शेगाव शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, शेगाव तालुकाध्यक्ष विजय भालतडक, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश सराफ, माजी सभापती गजानन जवंजाळ, पाणीपुरवठा सभापती पवन महाराज शर्मा, पांडुरंग बुच, अशोक चांडक, माजी नगरसेवक विजय यादव, दीपक ढमाळ, विदर्भ केसरी विजय बुच, सोनू मोहोड, विजय लांजुळकर आदींची उपस्थिती होती.