६० प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या एसटी चालकाला आमदारांनी घेतले बोलावून!
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मानेगाव येथील पूर्णा नदीच्या पुलावर एसटी बस जात असताना ब्रेक फेल झाले. मात्र त्याही परिस्थितीत बसवर हुशारीने नियंत्रण मिळवून ६० प्रवाशांचे प्राण जळगाव जामोद आगाराचे चालक गणेश वसंतराव बोदडे (रा. नांदुरा खुर्द) यांनी वाचवले. त्यांची कामगिरी आमदार राजेश एकडे यांच्या कानावर आली. त्यांनी लगेच त्यांना बोलावून घेत कार्याचे कौतुक केले आणि सन्मानही केला.
चालक बोदडे हे एमएच ४० एक्यू ६३३८ क्रमांकाची एसटी बस घेऊन जळगाव जामोदवरून नांदुऱ्याकडे २२ जुलैला जात होते. यावेळी बसमध्ये ६० प्रवासी होते. मानेगाव पार केल्यानंतर पूर्णा नदीच्या पुलाकडे वळत असताना अचानक बसचे ब्रेक फेल झाले. ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पुलावर जाण्यापूर्वीच बसवर नियंत्रण मिळवले व सुरक्षितरित्या उभी केली. त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळून प्रवाशांचे प्राण वाचले. ही माहिती आमदार एकडे यांना मिळताच त्यांनी बोदडे यांना कार्यालयात बोलावून घेतले व त्यांच्या कार्याचा आज, २७ जुलैला सत्कार केला. यावेळी नांदुरा नगर पालिकेचे उपाध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख लाला इंगळे, सामाजिक कार्यकर्ते गोकुल खेडकर, अनंता भारंबे, शशिकांत पाटील, सुहास वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.