सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा ‘ओपन स्पेस’वर कब्जा!; टीनशेड ठोकले, दुकान थाटले!!; शेगावमधील प्रकार, नगरसेवकासह नागरिकांनी नगरपालिकेला दिला अल्टिमेटम!
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः येथील व्यंकटेशनगर परिसरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम म्हणून मोकळ्या जागेचे नामकरण करण्यात आले होते. या ठिकाणी पोलीस विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने अतिक्रमण करून समाज मंदिर व संपूर्ण परिसर ताब्यात घेतला आहे. परिसरातील सर्व प्रकारचे अतिक्रमण त्वरित हटवावे, अशी मागणी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांकडे या भागाचे शिवसेना नगरसेवक दिनेश शिंदे व परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शेगाव येथील आळसणा रोड मार्गावर असलेल्या व्यंकटेशनगर परिसरामध्ये आम्रपाली नगरला लागून असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम नावाने मोकळी जागा आहे. या जागेमध्ये पूर्वी राष्ट्रसंतांचे भजन कीर्तन व इतर सांस्कृतिक कार्यक्रम, लहान मुलांचे खेळ तसेच संध्याकाळी परिसरातील नागरिक विसावा घेण्यासाठी एकत्रित येत होते. मात्र पोलीस विभागातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने या परिसरावर अवैध कब्जा करून या जागेवर चारचाकी वाहनांसाठी टीनशेड व इतर अतिक्रमण करून ठेवलेले आहे. याठिकाणी कपड्याचे दुकान सुद्धा अतिक्रमण करून थाटलेलेआहे. शेगाव नगरपालिकेने याबाबत त्वरित योग्य ती कारवाई करावी व मोकळ्या जागेवरील अतिक्रमण व ताबा त्वरित हटवावा अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर नगरसेवक दिनेश शिंदे, सुशील वनवे, अमोल चव्हाण, मंगेश मेटांगे, वैभव कोरडे, योगेश देशमुख ज्ञानेश्वर ताकोते यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत. अतिक्रमण नगरपालिका प्रशासनाने न हटविल्यास परिसरातील नागरिक स्वतःहून अतिक्रमण हटविणार असल्याचा इशारा या निवेदनाच्या शेवटी देण्यात आला असून यामध्ये काही अघटीत घडल्यास त्याला संपूर्णपणे नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. नगरसेवक दिनेश शिंदे, राष्ट्रीय कीर्तनकार सुशील वनवे, अमोल चव्हाण, ज्ञानेश्वर ताकोते, अंबादास इंगळे, टीटू सोनखासकर, नागेश फासे, नागेश कळसकर, संजय त्रिवेदी, रोहित पात्रीकर, समीर इंगळे, नवलसिंग डाबेराव, विजय बोराडे, सागर कळसकर, विनोद नाकोड, ऋषिकेश पाटील, सुरेश डोंगे, किशोर डाबेराव, मोहन सोळंके, प्रकाश वाघ, आकाश इंगळे, राजेंद्र लाड, प्रसाद पाटील, स्वप्नील सोनोने, भूषण देशमुख, कोमल राजपूत, ज्ञानेश्वर दाणे, रवींद्र लांजूडकर, वेदांत वाकडे, शुभम देशमुख आदींची उपस्थिती होती.