सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेची आत्महत्या; मोताळा तालुक्यातील घटना
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास धामणगाव बढे (ता. मोताळा) येथे घडली. विवाहितेच्या आईने रात्री उशिरा धामणगाव बढे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विवाहितेच्या पतीसह सासू व दिरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सरला ऊर्फ दीपाली नितीन कुसुंबे (रा. धामणगाव बढे) हिचे मागील वर्षी नितीनसोबत लग्न झाले होते. मात्र स्वयंपाक येत नाही. कामधंदा येत नाही, असे म्हणत सासरचे लोक तिचा छळ करत होते. वारंवार मारहाण करत होते. त्रासाला कंटाळून सरलाने काल विष घेतले. उपचाराला नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. रात्री उशिरा सरलाची आई सुनीता लालचंद मोरे (४५, रा. सोयगाव, जि. औरंगाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नितीन नारायण कुसुंबे, लीलाबाई नारायण कुसुंबे, प्रल्हाद नारायण कुसुंबे, मयूर नारायण कुसुंबे (सर्व रा. धामणगाव बढे ता. मोताळा) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.