सव्वा लाखाची चांदी घेऊन कारागिर फरारी!; खामगावातील घटना
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भांडे व दागिने तयार करण्यासाठी दिलेली सव्वा लाख रुपयांची दोन किलो चांदी घेऊन कारागिर फरारी झाल्याची घटना खामगाव शहरात समोर आली आहे. कॉटन मार्केटजवळील विश्वकर्मा सिल्व्हर हाऊसमध्ये ९ सप्टेंबरला रात्री साडेदहाला ही घटना घडली असून, या प्रकरणी काल, १० सप्टेंबरला रात्री तक्रार देण्यात आली. त्यावरून कारागिराविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गौतमदास कनाई दास (३५, मुर्शिदाबाद पश्चिम बंगाल) असे फरारी झालेल्या कारागिराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध राहुल कमल जांगीड (२४, रा. आशीर्वाद निवास जांगीड हाऊस कॉटन मार्केटजवळ खामगाव) यांनी तक्रार दिली आहे. विश्वकर्मा सिल्वर हाऊसचा कारखाना कॉटन मार्केटजवळ आहे. चांदीचे भांडे व दागिने तयार करण्याचे या ठिकाणी चालते. कारखान्यात बंगाली कारागिर आहेत. ते चांदीचे भांडे व दागिने तयार करतात. गौतमदास कनाई दास याच्याकडे राहुल जांगीड यांनी १ लाख ३० हजार रुपयांची दोन किलो चांदी भांडी व दागिने बनविण्यासाठी दिली होती. ही चांदी घेऊन तो पसार झाला. तपास सहायक पोलीस निरिक्षक पांडुरंग इंगळे करत आहेत.