संत माळेतील मणी शेवटचा, आज ओघळला एका एकी!; भाऊंच्या निधनावर सरसंघचालकांची शोकसंवेदना
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांचे काल, ४ ऑगस्टला सायंकाळी पाचला निधन झाले. जिल्ह्यासह, विदर्भ आणि राज्यातील अनेक भक्त शोकसागरात बुडाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी भाऊंचे मोठे चिरंजीव निलकंठ दादा यांना फोन करून सांत्वन केले.
सरसंघचालकांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले, की “संत माळेतील मणी शेवटचा, आज ओघळला एका एकी’… शिवशंकर भाऊ पाटील यांच्या देहावसानाची वार्ता ऐकून या ओळी मनात आल्या. पराकोटीची निस्पृहता आणि मनामध्ये कणव बाळगून शिवशंकर भाऊंनी प्रपंचाची वाटचाल परमार्थाच्या आधारावर करून दाखविली. व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात कमल पत्रावरील जल बिंदू प्रमाणे निर्लिप्त वृत्तीने अखंड सेवेचे व्रत चालविले. श्री. गुरुजी जन्मशती समितीचे सदस्य असताना त्यांच्या संत सदृश जीवनाचे दर्शन मला जवळून घेता आले हे मी माझे व्यक्तिगत सौभाग्य मानतो. एकादशीच्या पवित्र दिवशी त्यांनी सुरू केलेल्या पुढच्या प्रवासात शांती व प्रकाशाचा अधिकार त्यांनी मिळवलेलाच आहे. त्यांच्या सारखेच निरलस वृत्तीने भक्ती व सेवेचे व्रत अखंड सुरू ठेवण्याचे दायित्व आपणा सर्वांवर आले आहे. ते उत्तम रीतीने पार पाडण्याचे धैर्य व शक्ती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना श्री परमेश्वर चरणी करत मी श्री शिवशंकर भाऊंच्या पवित्र स्मृतीला माझी व्यक्तिगत तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो, असे सरसंघचालकांनी म्हटले आहे.