संग्रामपूर ः खतांच्या किंमती वाढवल्याने केंद्र सरकारचा राष्ट्रवादीकडून निषेध
संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्रातील भाजप सरकारने रासायनिक खतांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांना मोठा झटका दिला आहे. रासायनिक खत १०:२६:२६ ची किंमत प्रति बॅग ६०० रुपयांनी तर डी. ए. पी.ची किंमत प्रती बॅग ७१५ रुपयांनी वाढवली आहे.त्यामुळे कोरोनाच्या महामारीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप केंद्रातील भाजप सरकारने केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्रामपूर तालुका शाखेतर्फे आज, 17 मे रोजी तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्त्व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगितराव भोंगळ, तालुकाध्यक्ष नारायण ढगे यांनी केले. पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांच्या नेतृत्त्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. खतांची दरवाढ केंद्र सरकारने तातडीने रद्द करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी राजेश आमटे, तुकाराम घाटे, बाळू साबे, संजय गावंडे, इरसाद सुरतने, दुर्गासिंग सोळंके, मुन्ना पिसे पाटील, राजेश गिरी, पप्पू पठाण, सिद्धार्थ गाढे ,सुदर्शन घिवे, सदाशिव कुचेकार आदी उपस्थित होते.