शेगावमध्ये माजी नगराध्यक्षासह शेतकर्यांचे उपवास आंदोलन!
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या 40 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर नवी कृषी विधेयके रद्द करण्यासाठी शेतकरी आंदोलन करत असून, या आंदोलनास अनोख्या पाठिंबा देण्यासाठी माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शैलेंद्रादादा पाटील आणि तालुक्यातील शेतकरी बांधवांनी शेगाव येथे महात्मा गांधी चौकात आज, 7 जानेवारीला सकाळपासून उपवास आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवस काही न खाता-पिता हे आंदोलन चालणार आहे.
आंदोलनात शहराध्यक्ष दीपक सलामपुरिया, सरचिटणीस दिलीप पटोकार, सोनाजी कळसकार, नगरसेवक प्रफुल्ल ठाकरे, शैलेश पटोकार, त्र्यंबक पाटील, प्रल्हाद डाबेराव सहभागी झाले आहेत. प्रारंभी संत श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी खामगाव विधानसभा पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील, ज्येष्ठ नेते दयारामभाऊ वानखडे, सहकार नेते पांडुरंगदादा पाटील, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव बुरुंगले, अभयसिंह मोहता, किरण बापू देशमुख, डॉ. बुढन जमादार, जिल्हा सरचिटणीस कैलाश देशमुख, प्रकाश शेगोकार, अशोकराव हिंगणे, गोपालभाऊ कलोरे, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. असलम खान, संदीप काळे, शिवशंकर धनोकार, भिकूभैय्या सारवान, गजानन कळसकार, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान, हाशम भाई, शेख असलम, शिवसेना तालुकप्रमुख उमेश पाटील यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. देशाचा पोशिंदा शेतकरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहे. त्यामुळे आमच्या बांधवांसाठी दोन दिवस अन्नत्याग करून या शेतकर्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आंदोलन करत असल्याने श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. आंदोलनात 50 च्यावर शेतकर्यांनी बलिदान दिले असल्याने केंद्र सरकारने तातडीने या प्रश्नावर तोडगा काढावा, यासाठी हा आत्मक्लेश असल्याचे श्री. पाटील म्हणाले. सकाळपासून आंदोलनस्थळी सहभागासाठी शेतकर्यांची गर्दी वाढत आहे.