शेगावच्या अचंबित करणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची साखरखेर्डा सरपंचांना भुरळ!; गटनेते अग्रवाल, सभापती शर्मा यांच्याकडून घेतली माहिती
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः साठ किलोमीटर अंतरावरील वारी धरणातून विजेचा कोठेही वापर न करता गुरुत्व कलेने संतनगरीला मुबलक पाणीपुरवठा करणाऱ्या शेगाव नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचा नावलौकिक सर्वत्र पसरलेला आहे. त्यामुळे वीज बिलाशिवाय चालणाऱ्या या योजनेचे आकर्षण व अशीच योजना आपल्या शहर, गावात व्हावी अशी इच्छा त्या त्या शहर, गावातील लोकप्रतिनिधी व्यक्त करतात. साखरखेर्डाचे सरपंच दाऊद कुरेशी यांनाही या योजनेची भुरळ पडली. त्यांनी शेगाव नगर परिषदेमधील गटनेते शरद शेठ अग्रवाल यांच्याशी संपर्क केला. शेगाव नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचे अवलोकन करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला शरद शेठ अग्रवाल यांनी तात्काळ होकार दिला आणि कुरेशी यांना शेगाव भेटीचे निमंत्रण दिले. काल, 20 फेब्रुवारीला सकाळी सरपंच दाऊद कुरेशी यांनी शेगाव नगर परिषदेला भेट दिली. विद्यमान पाणीपुरवठा सभापती पवन महाराज शर्मा यांनी सर्वप्रथम त्यांचे स्वागत केले. वारी हनुमान वारी धरणातून शेगाव शहराला कशाप्रकारे पाणीपुरवठा केला जातो याची इत्यंभूत माहिती दिली. याप्रसंगी कवी अजीम नवाज राही, कमलाकर चव्हाण, समाधान जायभाये पाणीपुरवठा विभागाचे गणेश परमाळे उपस्थित होते. वीजबिल भरण्याची कोणतीही झंझट नसल्याने अशीच योजना साखरखेर्डा ग्रामपंचायत अंतर्गत कार्यान्वित करण्याचा मानस सरपंच दाऊद कुरेशी यांनी बोलून दाखविला.