शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यातून क्षमतेपेक्षा जास्त रेतीची उचल!; महसूल प्रशासनाने केले पंचनामे
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैध रेतीतस्करांनी सध्या जिल्ह्यात उच्छाद मांडला आहे. सर्रास उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची चर्चा होत आहे. असे असतानाच या चर्चेला बळ देणारा प्रकार काल, 26 जूनला समोर आला. महसूल विभागाने केलेल्या पाहणीत शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील 4 रेतीघाटांतून क्षमतेपेक्षा जास्त रेतीची उचल केल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणांचा पंचनामा करण्यात आला आहे. त्यामुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.
रेती घाटांतून क्षमतेपेक्षा जास्त रेतीचा उपसा केला जात असल्याची तक्रार माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ स्थळपाहणीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासनाला रेती घाट, रेती साठवणुकीचे ठिय्ये यांचे नव्याने स्थळ निरिक्षण आणि पंचनामे करण्याचे आदेश दिले. या पंचनाम्यांत शेगाव तालुक्यातील बोंडगाव रेती घाट, सोगोडा रेती घाट, संग्रामपूर तालुक्यातील ईटखेड रेती घाट आणि जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ रेती घाटातून परवानगीपेक्षा अधिक रेतीची उचल करण्यात आल्याचे समोर आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने विविध रेती साठे आणि रेती घाटांचा पंचनामा केला. जीपीएस यंत्रणेद्वारे तांत्रिक तपासणी केली.
काल केलेल्या या धडक कारवाईत खामगावचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, शेगाव तहसीलदार शिल्पा बोबडे, संग्रामपूर येथील उपविभागीय अधिकारी तथा परिविक्षाधिन अधिकारी तेजश्री कोरे, संग्रामपूरचे तहसीलदार विजय चव्हाण, बांधकाम विभागाचे श्री. ढाकणे, मंडळ अधिकारी श्री. चांभारे, मंडळ अधिकारी जी. आय. राऊत, तलाठी पी. एम. नलावडे, तलाठी श्री. डाबेराव, पोलीस पाटील गोपाल सोळंके, चालक श्री. सातभाकरे यांच्यासह जलंबचे ठाणेदार धीरज बांडे, शेगाव ग्रामीणचे ठाणेदार गोकूळ सूर्यवंशी, रवींद्र लांडे, वनविभागाचे पी. जी. सानप यांच्यासह महसूल, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.