शेगाव बाजार समितीत शेतमालांव्यतिरिक्त येणाऱ्या वाहनांना बसणार चाप!; पार्किंग शुल्क लागू
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात बिगर शेतमाल वाहनचालकांना परिसरात येण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे बाजार समितीतील विनाकारणची वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
शेगाव शहरात पार्किंगची सोय नसल्याने अनेक वाहनचालक आपली वाहने कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात उभी करून निघून जात होते. त्यामुळे बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे वाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आणणे सुद्धा अशक्य झाले होते. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने शेतमाल आणणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहनांसाठी पार्किंग शुल्क आकारणे सुरू केले आहे. यात दहाचाकी ट्रकला शंभर रुपये, सहा चाकी ट्रकला 70 रुपये तर 407 वाहनाला 50 रुपये याप्रमाणे दर आकारण्यात येत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विलास भाऊ पुंडकर यांनी दिली.