शेगाव, जळगाव जामोदमध्ये लवकरच ऑक्सिजन प्लांट!; आमदार डॉ. कुटे यांची माहिती
बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 98229888820 ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव आणि जळगाव जामोद मतदारसंघात केंद्र सरकारने मंजूर केलेले ऑक्सिजन प्लांट लवकरच उभारले जाणार असल्याने ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, अशी माहिती जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांनी दिली.
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आपल्या मतदारसंघातील आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी आमदार डॉ. कुटे यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत पाटील, उपविभागीय अधिकारी श्री. जाधव, नायब तहसीलदार डॉ. सागर भागवत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण घोंगडे, डॉ. इकबाल शेख, न.प. प्रशासन अधिकारी रमेश ठाकरे यांच्यासह शेगाव न.प.चे भाजप गटनेते शरदसेठ अग्रवाल, पांडूरंग बूच, संतोष देशमुख, शहराध्यक्ष ज्ञानेश्वरअप्पा साखरे, न.प. सभापती पवन शर्मा, माजी सभापती गजानन जवंजाळ, राजेश अग्रवाल, गणेश शेळके आदींची उपस्थिती होती.
शेगावच्या सईबाई मोटे रुग्णालयात साहित्याची कमतरता असून, ते तत्काळ उपलब्ध करण्याचे निर्देश डॉ. कुटेंनी देत या ठिकाणी 50 ऑक्सिजन बेडची व्यवस्था काही दिवसांत होणार असल्याचे सांगितले. शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील सरकारी दवाखान्यांतील रिक्त पदांची तातडीने भरती करण्याचे आदेशही त्यांनी दिले. संग्रामपूरमध्ये 50 बेडचे सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्यात येईल. या ठिकाणी प्रशिक्षित व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी त्यांनी केली. काही दिवसांतच संपूर्ण विदर्भाला वर्धा येथून रेमडेसिवीरचा पुरवठा होणार असल्याची केंद्रीय नितीन गडकरी यांनी आपल्याला दिल्याचे यावेळी डॉ. कुटे यांनी सांगितले.
कुटे कुटुंबाकडून 30 ऑक्सिजन कॉन्स्टेट्रेटर
कोरोनावर मात करून घरी परतलेल्या रुग्णांना पुढील काही दिवस श्वसनाचा त्रास होतो. या रुग्णांना घरीच ऑक्सिजनची सुविधा मिळावी म्हणून स्वखर्चाने आमदार डॉ. कुटे यांनी 10, त्यांचे मोठे बंधू राजेंद्र कुटे यांनी 10 आणि लहान बंधू प्रमोद कुटे यांनी 10 असे 30 ऑक्सिजन कॉन्स्टेट्रेटर बुक केले असून, पुढील आठवड्यापासून ते गरजवंतांना घरपोच वापरासाठी दिले जातील.