विठ्ठल मंदिरावर वीज कोसळून घुमट फाटले; संग्रामपूर तालुक्यातील घटना
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर तालुक्यातील आवार येथील श्री विठ्ठल मंदिरावर वीज कोसळून मंदिराचा घुमट फाटले. ही घटना आज, १६ ऑक्टोबरला सायंकाळी घडली.
गावाच्या मध्यभागी विठ्ठल मंदिर असून, मंदिराच्या घुमटावर संध्याकाळी सातला वीज कोसळली. त्यामुळे घुमट फाटला आहे. आवार गावावरील संकट विठ्ठलाने तारल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. सुसाट वाऱ्यामुळे पातुर्डा येथे अशोक फ्री बोर्डिंग ऑटो स्टाॅपजवळ असलेल्या झाडाच्या फांद्या तारांवर पडून तारा तुटल्याची माहिती सहाय्यक अभियंता बोर्डे यांना समजताच त्यांनी विद्युत कर्मचारी सुरेश वानखडे यांना विद्युत पुरवठा तात्काळ विद्युत पुरवठा बंद करण्याचे आदेश दिल्याने रहदारीचा रस्ता असल्याने अनर्थ टळला. परतीचा पावसाचा तडाखा संग्रामपूर तालुक्याला बसला असून, बऱ्याच शेतकरी बांधवांचे सोयाबीन, कपाशी आणि इतर पीक काढणीला आलेले असताना जोरदार पाऊस झाल्याने या पिकांचे अतोनात नुकसान होणार आहे.