विकृताने शेतातील सिंचन साहित्याला आग लावून 3 लाखांचे केले नुकसान!; शेतकरी हवालदील, जळगाव जामोद तालुक्यातील घटना
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतातील ठिबक सिंचन संच, स्प्रिंकलर व बैलगाडीला आग लागून शेतकऱ्याचे 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज, 13 मे रोजी पहाटे (मध्यरात्री) साडेबाराच्या सुमारास टाकळी खाती (ता. जळगाव जामोद) शिवारात समोर आली. शेतकरी शेतात धावेपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते.
सूत्रांनी सांगितले, की प्रफुल्ल अजाबराव अंमलदार (33, रा. टाकळी खाती) यांची आई देवकाबाई अजाबराव अंमलदार यांच्या नावे टाकळी खाती शिवारात दीड एकर शेती आहे. त्या शेतामधील उंबराच्या झाडाला 12 एकराचे ठिबक सिंचन संच लटकवलेले होते. काही खाली ठेवलेले होते. स्प्रिंकलरचे 3 सेट बैलगाडीवर ठेवले होते. काल, 12 मे रोजी सायंकाळी 6 ला जनावरांना चारा पाणी करून ढोरे गोठ्यात बांधून प्रफुल्ल घरी आले. आज, 13 मे रोजी पहाटे साडेबाराला त्यांचा पुतण्या गोपाल साहेबराव अंमलदार याने आवाज दिला. आपल्या शेतामध्ये आग लागल्याचे सांगितले. त्यामुळे ते गोपाल व जाबराव अंमलदार, शालीग्राम ठाकरे यांच्यासह शेतात धावले. पण तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. यात ठिंबक सिंचन संच (किंमत अडीच लाख रुपये), स्प्रिंकलर 3 सेट (किंमत 40 हजार) व बैलगाडी (किंमत 10 हजार) असे एकूण 3 लाख रुपयांचे नुकसान कुणीतरी केल्याची तक्रार प्रफुल्ल अंमलदार यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात केली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.