वाहऽऽ…असाही आदर्श…!; विधवा सुनेचे सासू-सासऱ्यांनी केले कन्यादान!; जळगाव जामोद तालुक्यातील आदर्श
जळगाव जामोद (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुनेचा लेकीसारखा सांभाळणाऱ्या सासू-सासऱ्यांनी मुलाच्या निधनानंतर तिचा विवाह लावून दिल्याची अनोखी घटना सुनगाव (ता. जळगाव जामोद) येथे समोर आली आहे.
शालिग्राम लक्ष्मण वानखडे आणि त्यांच्या पत्नी वत्सलाबाई यांनी हा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांचा मुलगा संतोषचा विवाह 16 मार्च 2020 रोजी धामणगाव (ता. संग्रामपूर) येथील राधा रामदास उमाळे या मुलीशी विवाह झाला होता. मात्र दुर्दैवाने दोन- तीन महिन्यांतच 31ऑगस्ट 2020 रोजी संतोषचा विहिरीत पडून मृत्यू झाला. राधा सासू-सासऱ्यासोबतच राहत होती. त्यांनीही तिचा लेकीसारखा सांभाळ केला. 5 मार्च 2021 रोजी राधाचा विवाह खेरडा येथील प्रशांत शत्रुघ्न राजनकार यांच्याशी सुनगाव येथे नोंदणी पद्धतीने त्यांनीच लावून दिला. त्यांनी सुनेचे केलेल्या कन्यादानाची कौतुकाने चर्चा हाेत आहे. विवाहात कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात आले. मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा छोटेखानी सोहळा झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल इंगळे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण धर्मे, मीराताई भड, पांडुरंग गवई, पत्रकार राजकुमार भड, महाले मॅडम, मनोहर वानखडे, उमेश कुर्वाडे, अनिल धुळे उपस्थित होते.