वनविभागाचे रोही झालेत “जावई’!; ना उपाययोजना करेनात, ना शेतकऱ्यांना भरपाई देईनात!!; खामगाव तालुक्यात संताप
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पिके ऐन बहरात आली असताना वन्यप्राणी हैदोस घालत आहे. रोही आणि हरणामुळे पिकांचे नुकसान झाल्याच्या शेकडो तक्रारी वनविभागाला प्राप्त झाल्या असल्या तरी उपाययोजना शून्य आहेत. नुकसान भरपाईबाबत सुद्धा कोणत्याच हालचाली गांभीर्याने होत नसल्याने जिल्हाभरातील शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. खामगाव तालुक्यातील चिंचपूर शिवारात तर एका शेतकरी महिलेच्या ८० टक्के सोयाबीन पिकाचे रोह्यांनी तुडवून, खाऊन नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे.
चिंचपूर येथील सौ. सुशीलाबाई शिवदास शेळके यांच्या चिंचपूर शिवखोरा शिवारातील शेतात रोही आणि हरणांनी २३ जुलैच्या रात्री हैदोस घातला. दोन एकर शेतातील ८० टक्के सोयाबीन पिकांचे खाऊन व तुडवून नुकसान केले. या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची व वन विभागाकडून शेतीला कुंपण करून देण्याची मागणी शेतकरी व गावातील नागरिक करत आहेत. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून वन विभाकडून मदत देण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे. यावेळी सरपंच संजय उपासे, उपसरपंच प्रकाश गाडगे, पोलीस पाटील जेतालाल चव्हाण, सुनील कदम, शिवदास शेळके, अब्दुल भाईजान, रफिक शाह, सिद्धेश्वर सरजने, दलसिंग चव्हाण, विनोद देशमुख ,अनंता शेळके, गजानन निर्मळ, अशोक राठोड, पवन शेळके, यांची उपस्थिती होती.