लेकीने सोडले, पण माणुसकीने तारले…!; निराश्रित वृद्धेला त्यांनी दिलाय आता आधार!; नांदुऱ्यातील घटना
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बसस्थानकात काही दिवसांपासून 72 वर्षीय वृद्ध महिला भिक्षा मागत होती. ओमसाई फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळताच त्यांनी वृद्धेची चौकशी करून नांदुरा तालुक्यातील दहीगाव येथील वृद्धाश्रमात तिला आधार मिळवून दिला.
ही वृद्धा यवतमाळची असल्याचे सांगण्यात आले. बसस्थानकात निवारा करून ती मिळेल ते खात होती. ही बाब एसटीचे वाहतूक नियंत्रक प्रदीप गायकी यांच्या लक्षात आली. त्यांनी याची माहिती ओमसाई फाउंडेशनच्या विलास निबोळकार यांना दिली. त्यांनी बसस्थानक गाठत वृद्धेसोबत संवाद साधला.
आधारकार्डवरून तिची ओळख पटली असून तिचे नाव द्वारकाबाई नारायण गिरी असून. द्वारवा रोड चपराशी कॉलनी यवतमाळ येथील ती रहिवासी आहे. तिला एकच मुलगी असून काळजी घेत नसल्याने अशा अवस्थेत जगत असल्याचे समोर आले. कार्यकर्त्यांनी तालुक्यातील दहिगाव येथील संत गाडगे महाराज मिशन द्वारा संचलित वृद्धाश्रमाचे अधिकारी सुनील सातव यांच्यासोबत चर्चा करून वृद्धाश्रमात तिला निवारा देण्याबाबत विनंती केली. वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी याबाबत समर्थता दर्शविल्यानंतर विलास निबोळकार, प्रविण डवगे, सचिन जैन, श्याम अंदुरे, प्रभाकर सपकाळ आदींनी तिला तातडीने वृद्धाश्रमात दाखल केले.