राजमाता जिजाऊ चौक, संभाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण करा; शेगावमध्ये मागणी
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील राजमाता जिजाऊ चौक आणि छत्रपती संभाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेड आणि मराठा पाटील युवक समितीने केली आहे.
यासंदर्भात नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की छत्रपती संभाजी महाराज स्मृती दिनी चौकात कुठलीही साफसफाई नव्हती. त्यामुळे शिव शंभो प्रेमींनी साफसफाई केली आणि स्मृतिदिनी अभिवादन केले. पुढील मासिक सभेत दोन्ही चौकांचे काम करण्यासाठी आणि नियोजनासाठी विषय घेऊन त्यावर अंमलबजावणी करावी. अन्यथा यापुढे सर्वच समविचारी संघटना लोकशाही मार्गाने मागणी करत राहतील आणि पुढील आंदोलनास आपण जबाबदार असाल, असा इशाराही निवेदनात दिला आहे. निवेदन देताना या विधानसभा अध्यक्ष विठ्ठल अवताडे, मराठा पाटील युवक समिती शेगाव शहराध्यक्ष श्याम पाटील आढाव, कार्याध्यक्ष विठ्ठल लांजुलकर, नीलेश तिव्हणे, संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष आकाश पवार, तालुका सचिव उमेश पाटील अवचार, ज्ञानेश्वर निंबाळकर आदी उपस्थित होते.
शेगाव शहरातील इतर चौकांचे ज्याप्रमाणे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे राहिलेल्या चौकांचे तसेच छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ठराव घेऊन सौंदर्यीकरण्याचे काम सुरू करावे. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकशाही मार्गाने अतिशय तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
विठ्ठल अवताडे, जळगाव जामोद विधानसभा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज हा आमच्या शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे नगरपरिषदेने येणाऱ्या पुढील सर्वसाधारण सभेत छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या सौंदर्यीकरण्याचा ठराव घ्यावा. अन्यथा संपूर्ण शहरात शिव शंभू प्रेमींच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.
श्याम अढाव, मराठा पाटील युवक समिती, शेगाव शहराध्यक्ष