मलकापूरचे हत्याकांड : मुलीला १४ दिवसांचा MCR; पुतण्याला ३ दिवसांचा PCR
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पोटच्या मुलीने चुलत भावाच्या मदतीने बापाचा खून केल्याची घटना ८ सप्टेंबरच्या रात्री मलकापूर शहरातील सुभाषचंद्र बोसनगरात घडली होती. आरोपी मुलगी लक्ष्मी सनिसे (२९) व तिचा चुलतभाऊ प्रकाश रावणचवरे (२८) या दोघांनाही आज, ११ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने लक्ष्मीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी तर प्रकाशला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तीन वेळा लग्न होऊनही लक्ष्मीचे सासरी पटत नव्हते. त्यामुळे ती नेहमी माहेरीच राहत होती. ८ सप्टेंबरच्या रात्री मी सासरी जाणार नाही. माहेरीच थांबणार, असे तिने वडील गुलाबराव रावणचवरे यांना सांगितले. त्यावर अजून तुझ्या दोन बहिणीचे लग्न व्हायचे बाकी आहे. त्यामुळे तू इथे राहू नको, असे तिचे वडील तिला म्हणाले होते. त्यामुळे लक्ष्मी आणि तिच्या वडिलांमध्ये वाद झाला. यावेळी लक्ष्मी आणि तिचा चुलत भाऊ प्रकाशने गुलाबराव यांच्या छातीत चाकूने सपासप वार करून त्यांना ठार मारले होते. लक्ष्मीची लहान बहीण वैष्णवीने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली होती. ८ सप्टेंबरच्या रात्रीच पोलिसांनी लक्ष्मी आणि प्रकाशला अटक केली होती. त्यानंतर दोघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता लक्ष्मीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी तर प्रकाशला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.