भूईमुगाचे भाव पाडल्याने खामगावात शेतकरी चिडले! दगडफेकीत तीन जण जखमी; कृषी उत्पन्न बाजार समितीत तणाव

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत काही दिवसांपासून भूईमुगाची आवक वाढली आहे. परिणामी आज, 28 मे रोजी सकाळी बाजार समितीत भूईमुगाचे भाव पडले. भूईमुगाला अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकरी चिडले. त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती सचिवांच्या कार्यालयात धाव घेत सचिवांना धारेवर धरले. यातून वाद वाढत गेला. दुसरीकडे …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव येथील कृषी उत्पन्‍न बाजार समितीत काही दिवसांपासून भूईमुगाची आवक वाढली आहे. परिणामी आज, 28 मे रोजी सकाळी बाजार समितीत भूईमुगाचे भाव पडले. भूईमुगाला अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकरी चिडले. त्‍यांनी विरोध करायला सुरुवात केली. संतप्‍त शेतकऱ्यांनी बाजार समिती सचिवांच्‍या कार्यालयात धाव घेत सचिवांना धारेवर धरले. यातून वाद वाढत गेला. दुसरीकडे बाहेर कुणीतरी शेतकऱ्यांवर दगड भिरकावल्याने प्रत्युत्तरात शेतकऱ्यांनीही दगडफेक केली. यात दोन शेतकऱ्यांसह एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहेत. परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्याने बाजार समितीत पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. दुपारपर्यंत बाजार समितीत तणाव कायम होता.
बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्‍न बाजार समिती म्‍हणून खामगाव बाजार समितीला ओळखले जाते. काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भूईमूगाची आवक वाढली आहे. दरम्यान, वाढत्या आवकेमुळे शुक्रवारी बाजार समितीत भूईमुगाचे भाव पडले. केवळ 3200 रुपये क्विंटलने खरेदी करण्याचा पुकारा झाल्याने शेतकरी संतप्त झाले. त्‍यांनी विरोध सुरू केला. शेतकऱ्यांच्‍या एका गटाने बाजार समिती सचिवांचे कार्यालय गाठले. सचिवांसोबत तिथेही वाद झाला. यादरम्‍यान बाहेर असलेल्या शेतकऱ्यांच्या दिशेने कुणीतरी दगड भिरकावले. प्रत्‍युत्तरात शेतकऱ्यांनीही दगडफेक केली. त्यामुळे दीपक दसरकर या पोलिसासह उंद्री (ता. चिखली) येथील एक शेतकरी जखमी झाला. दसरकर यांच्या हातावर दगड लागला, तर उंद्री येथील शेतकऱ्याच्या डोक्यात दगड लागल्याने त्याचे डोके फुटले. त्याचप्रमाणे बाजार समितीसमोर नास्त्याच्या हॉटेलमधील एक जण किरकोळ जखमी झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे निदर्शनास येताच, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले.

एसडीपीओ अमोल कोळी घटनास्थळी दाखल
बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाल्याचे समजताच शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल कोळी हेदेखील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले. पोलिसांनी शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

बाजार समितीत धावपळ!
तुरळक दगडफेक आणि शेतकरी आक्रमक झाल्यानंतर दुपारी बाजार समितीतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यावेळी बाजार समिती प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. एका पाठोपाठ एक अशा तीन गाड्या बाजार समितीत दाखल होताच, शेतकऱ्यांसह अडते आणि उपस्थितांमध्ये धावपळ उडाली. पोलीस कारवाईच्या भीतीने अनेकांनी बाजार समितीतून काढता पाय घेतला.