बुलडाणेकरांनो सावधान…तुम्हालाही मेसेज आलाय का?
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील नागरिकांना सध्या मोठ्या प्रमाणावर एक मेसेज प्राप्त होत असून, या मेसेजमध्ये तुमच्या मोबाइलमधील सीमकार्डचे डॉक्युमेंट व्हेरिफाय झालेले नाहीत. ते व्हेरिफाय करण्यासाठी 7074460908 या क्रमांकावर (तुमच्याकडे आलेल्या मेसेजमध्ये दुसराही क्रमांक असू शकतो.) कॉल करण्यास सांगण्यात येत आहे. तुम्ही जर कॉल केला नाहीत तर तुमचे सीम कार्ड बंद पडेल असे सांगण्यात येत आहे. मोबाइल बंद पडेल म्हणून तुम्ही लगेच कॉल करत असाल तर सावधान..! तुमचे बँक बॅलन्स खाली करण्याचा हा नवा फंडा भामट्यांनी शोधला आहे हे लक्षात घ्या.
काही नागरिकांनी या नंबरला कॉल केला असता त्यांना टीमव्ह्यूअर, एनीडेस्कसारखे ॲप डाऊनलोड करायला सांगितले जाते. पण तुम्ही त्यांच्या सांगण्याप्रमाणे पुढे गेलात तर तुमच्या मोबाइलचे सर्व नियंत्रण भामट्याच्या हाती जाते आणि त्याद्वारे तो तुमचे बँक खाते खाली करतो हे लक्षात घ्या. त्यामुळे शेतकरी, नागरिकांनी अशाप्रकारे मेसेज आला असेल तर दूर्लक्ष करावे. कोणतेही सीमकार्ड आपण घेतो तेव्हाच त्यासंबंधित सर्व प्रक्रिया झालेल्या असतात. त्यामुळे तुम्हाला कुणी काहीही सांगत असेल तर लक्ष देऊ नका.
गुगलवर कस्टमर केअर सर्च करताय?
अनेक जण एखाद्या सेवेसाठी त्या कंपनीचा नंबर गुगलवर सर्च करतात. पण असे करणेही धोकादायक झाले आहे. फोन पे बंद पडले, गुगल पे काम करत नाही, एखाद्या ट्रॅव्हल एजन्सीचा नंबर हवाय किंवा बँकेचा नंबर अनेक जण गुगलवर सर्च करतात. मात्र गुगलवर अनेक भामट्यांनी आपले नंबर कस्टमर केअर म्हणून नोंद करून ठेवले आहेत. आपला कॉल त्यांना जातो आणि त्यांनी विचारलेली माहिती आपण त्यांना सांगतो. पण असे करू नका. तुमच्या बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती कुणालाही देऊ नका. अगदी खरोखर बँकेतून कॉल आलेला असला तरीही आपली कोणतीच माहिती जसे की एटीएमचा पीन, आपली जन्मतारिख, मोबाइलवर आलेला ओटीपी कधीच सांगायचा नाही. त्यांनी एखादे ॲप डाऊनलोड करायला सांगितले तरी ते करायचे नाही. याउप्परही तुम्ही त्यांच्या गळाला अडकलातच, तर तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क करा किंवा आपल्या नजिकच्या पोलीस ठाण्याला कळवा. २४ तासांच्या आत तक्रार केली तर बँकेला सांगून पैसे परत मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. पण असे संकट ओढावून घेण्यापेक्षा सावध राहिलेलेच चांगले नाही का?