बुलडाणा लाइव्‍ह विशेष : ‘ते’ 3 रात्री उपाशी झोपले… जगण्यापुरते तरी अन्न द्या..!

लॉकडाऊन व संचारबंदीच्या चक्रव्यूहात भरडले जात आहेत गरीब, बेघर, श्रमिक!, प्रशासन, स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराची गरज शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काही बेफिकीर लोकांमुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचे संकट पुन्हा एकदा जिल्ह्यावर ओढावले आहे. नाइलाजाने प्रशासनाला संचारबंदी, लॉकडाऊनसारखे कडक उपाय अवलंबावे लागत आहेत. मात्र हे करताना या काळात गरीब, बेघर, श्रमिकांचे काय होणार, याचा विचार …
 

लॉकडाऊन व संचारबंदीच्या चक्रव्यूहात भरडले जात आहेत गरीब, बेघर, श्रमिक!, प्रशासन, स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराची गरज

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः काही बेफिकीर लोकांमुळे कोरोनाच्‍या प्रादुर्भावाचे संकट पुन्‍हा एकदा जिल्ह्यावर ओढावले आहे. नाइलाजाने प्रशासनाला संचारबंदी, लॉकडाऊनसारखे कडक उपाय अवलंबावे लागत आहेत. मात्र हे करताना या काळात गरीब, बेघर, श्रमिकांचे काय होणार, याचा विचार ना प्रशासन करते ना लोकप्रतिनिधी. लोकप्रतिनिधींच्‍या दृष्टीने तसाही हा घटक दूर्लक्षितच. मागील लॉकडाऊन काळात अनेक सामाजिक संस्था, संघटना या घटकांचे पोट भरण्यासाठी पुढे आल्या होत्‍या. पण शुक्रवार, शनिवार आणि रविवारची सायंकाळही या बिचाऱ्यांच्‍या पोटात अन्‍नाचा कणही जाणेही अवघड झाले होते. बोटावर मोजण्याइतक्‍या गरीबांनी मागून अन्न मिळवले, बाकीचे उपाशी झोपले. शेगावमध्ये मनोरुग्‍णांची संख्याही मोठी आहे. त्यांना तर अन्न मागावे लागते हेही कळत नाही. बिच्‍चारे तेही या काळात उपाशीपोटी राहिले… लॉकडाऊनचे हे दुर्दैवी चित्र दूर दूर्लक्षित करण्यासारखे अजिबातच नाही. माणुसकीच्‍या दृष्टीने तर नाहीच नाही…

गेले ३ दिवस या उपेक्षित घटकांना कुणीच वाली नसल्याचे दिसून आले. शेगावमध्ये श्रींच्‍या मंदिरामुळे भिकारी आणि मनोरुग्‍णांची संख्या मोठी आहे. शिवाय गरीब, बेघर, श्रमिकांची संख्याही लक्षणीय. तसा हा वर्ग जिल्हाभर आहे. मात्र शेगावमध्ये त्‍यांच्‍या संख्येमुळे प्रामुख्याने दिसून येतो. शुक्रवारी दुपारपासून लॉकडाऊन सुरू झाला. तसे रस्‍ते निर्मनुष्य झाले. शनिवार आणि रविवार तर शहरात शुकशुकाट होता. यात या घटकाची उपासमार झाली. अनेक जणांच्‍या पोटात अन्नाचा कणही गेला नाही. विशेष म्‍हणजे जो तो लॉकडाऊन, वाढते कोरोना रुग्‍ण याचीच चर्चा करत होता. पण आपल्यासारखाच एक जीव या लॉकडाऊनमध्ये सध्या उपाशीपोटी झोपतोय याची कल्‍पनाही कुणी केली नसेल. संचारबंदी 8 मार्चपर्यंत वाढली आहे. त्‍यामुळे या घटकांपुढे जीवन-मरणाचे संकट आहे. त्‍यांच्‍यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. सामाजिक संस्‍था, संघटना, अधिकारी, नेते मंडळी, कार्यकर्ते यांनी पुढे येऊन या घटकाच्‍या पोटात किमान जगण्यापुरते तरी अन्न जाईल याची कटाक्षाने काळजी घेण्याची गरज आहे. एवढी माणुसकी तर आपण सर्वांनीच ठेवली पाहिजेत… शेगावमध्ये जवळपास 30 च्‍या आसपास भिकारी आहेत. मनोरुग्‍णांची संख्या 10 च्‍या आसपास आहे. रेल्‍वेस्‍टेशन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अग्रेसन महाराज चौक, संत गजानन महाराज मंदिर आदी भागांत हे घटक दिसून येतात. पुढील काही काळ त्‍यांच्‍याकडे प्रत्‍येकाचे लक्ष असू द्या, असे आवाहन बुलडाणा लाइव्‍ह करत आहे…