नांदुरा, लोणार येथे श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन कार्यालयांचे उद्घाटन
नांदुरा (प्रविण तायडे/प्रेम सिंगी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अयोद्ध्येत उभारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन जिल्ह्यात सुरू असून, नांदुरा व लोणार येथे निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन आज, १० जानेवारीला करण्यात आले.
नांदुरा येथे सरकारी चावडी जवळील राजेंद्र पांडे यांच्या जागेत कार्यालय सुरू झाले आहे. त्याचे उद्घाटन विदर्भरत्न हपभ अरुण महाराज नायसे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खामगाव जिल्हा कार्यवाह तथा अभियान प्रमुख विजय पुंडे, नांदुरा शहर संघचालक गणेश नत्थानी प्रामुख्याने उपस्थित होते. निधी संकलन १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे.
लोणारमध्ये कार्यालयाचे उद्घाटन
लोणारमध्येही श्रीराम मंदिर निधी समर्पण समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन आज खटकेश्वरनगर येथे महंत लक्ष्मणानंद गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.