नांदुरा तालुक्याचे अनपेक्षित निकाल; ‘यांना’ मिळाला धक्का तर ‘यांना’ दिलासा वाचा…
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला झाली होती. आज, 18 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. सकाळी 9 ला तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. ठाणेदार सुरेश नाईकनवरे हे तहसील कार्यालय व बाहेर परिसरात चोख बंदोबस्त लावून स्वतः कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हजर राहून कर्मचारी व अधिकार्यांना सहकार्य करत होते. 48 पैकी 3 ग्रामपंचायती अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत.
सकाळी पहिल्या फेरीत पोटळी, चांदुर बिस्वा, विटाळी, वसाळी बुद्रुक या ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर करण्यात आले. वसाळी बुद्रूक येथे भाजप नेते माजी सरपंच बळीराम गिर्हे यांच्या ग्राम सुधार पॅनलने सत्ता राखली तर धानोरा बुद्रूक येथील राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली उध्वव पाटील यांच्या पॅनलने 5 जागा जिंकल्या. त्यांनी 2 जागा अगोदरच बिनविरोध केल्या होत्या. सर्वात धक्कादायक निकाल पिंपळखुटा धांडे गावात लागला. काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवान धांडे पाटील यांना गावाची सत्ता केवळ 2 सदस्य राखून गमवावी लागली. त्यांचे प्रतिस्पर्धी गजानन धांडे पाटील यांच्या पॅनलने 5 जागी दणदणीत विजय मिळवला. दादगाव येथील शिवसेना नेते तथा तालुका राजकारण सक्रिय असणारे माजी सरपंच राजू पाटील यांच्या पॅनलला जोरदार झटका बसला आहे. प्रकल्प म्हटलं की जिगाव येथील बहुचर्चित लढत लक्षवेधी ठरली. कारण शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य वसंतराव भोजने यांच्या पॅनलला 7 पैकी फक्त 2 जागांवर समाधान मानावे लागले. वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजरत्न तायडे यांच्या पॅनलने या ठिकाणी 5 जागी दणदणीत विजय संपादन केला आहे. मोमीनाबाद ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच रमण काळे यांनी पुन्हा सत्ता काबीज केली आहे. महाळुंगी येथील लढतही वादळी ठरली असून येथे मतदानाच्या दिवशी वाद झाला होता. त्यामुळे या निकालाकडे तालुक्याचं लक्ष लागलं होतं. शेवटी येथे शिवसेना तालुका प्रमुख संतोष डिवरे यांच्या पॅनलने जोरदार मुसंडी मारून विजय मिळवला आहे. भाजपचे जिल्हा नेते बलदेवराव चोपडे यांनी रसुलपूर ( कोळंबा) ग्रा. पं.मध्ये 5 जागा बिनविरोध केल्या होत्या. 2 जागी मतदान झालं होतं. त्यातील 1 जागा त्यांनी मिळवली आहे. तांदुळवाडी येथे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सुनील जुनारे यांनी 7 पैकी जागा जिंकून आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे. टाकळी वतपाळ येथे राम पांडव व आकाश वतपाळ यांच्या गावकरी पॅनलने बाजी मारली असून, सर्व तरुणयुवा कार्यकर्ते आहेत. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली वडनेर भोलजी येथे 35 वर्षांपासून एक हाती असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन बापू देशमुख यांच्या पॅनलने 17 पैकी 16 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. निकालाचा कौल पाहता बहुतेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसून अनपेक्षित निकाल लागले आहेत. या निवडणुकीत अनेक तरुणांनी आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. कृउबा समिती माजी संचालक बाळासाहेब दामोदर यांनी आपल्या पत्नीला जिंकून आणत दलित नेतृत्व सिद्ध केलं आहे. एकंदरीत ही निवडणूक अनेकांसाठी धक्कादायक तर काहींसाठी दिलासादायक ठरल्याच चित्र दिसून आलं .वंचित बहुजन आघाडीच्या चांदुर बिस्वा येथील वॉर्ड क्रमांक 3 च्या उमेदवार सौ. सिंधुताई राजेश वाकोडे यांनीसर्वाधिक 401मतांनी निवडून येण्याचा मान तालुक्यातून मिळविला आहे. सर्वाधिक उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून आले, असा दावा करत विजयी उमेदवारांचे स्वागत आमदार राजेश एकडे यांनी केले.